Friday, May 22, 2026
HomeBhamragad“शासकीय योजनांचा लाभ हा प्रत्येक नागरिकाचा हक्क” – अमर राऊत...

“शासकीय योजनांचा लाभ हा प्रत्येक नागरिकाचा हक्क” – अमर राऊत…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

भामरागडमध्ये मल्टिमीडिया प्रदर्शनाचे उद्घाटन; ८५ शासकीय योजनांची माहिती एकाच ठिकाणी,

गडचिरोली/भामरागड,१७ मार्च २०२६::- “शासकीय योजनांचा लाभ घेणे हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे. नागरिकांनी विविध योजनांची माहिती जाणून घेऊन त्यांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा,” असे प्रतिपादन सहायक जिल्हाधिकारी तथा आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी अमर राऊत यांनी केले.

जिल्हा प्रशासन, जिल्हा पोलीस प्रशासन व सामाजिक न्याय विभाग यांच्या सहकार्याने जिल्हा माहिती कार्यालयामार्फत तहसील कार्यालय, भामरागड येथे शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांवरील मल्टिमीडिया छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन अमर राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी अमर मोहिते, जिल्हा माहिती अधिकारी गजानन जाधव व तहसीलदार किशोर बागडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

उद्घाटनप्रसंगी ते पुढे म्हणाले की, या प्रदर्शनामधून योजनांची थोडक्यात व सुस्पष्ट माहिती नागरिकांपर्यंत पोहोचत असून त्याचा निश्चितच लाभ होईल. भामरागडसारख्या दुर्गम भागात अशा प्रकारे योजनांची माहिती पोहोचविणे हा जिल्हा माहिती कार्यालयाचा स्तुत्य उपक्रम आहे. तसेच सर्व शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या विभागाच्या योजना शेवटच्या गाव व टोल्यांपर्यंत पोहोचवाव्यात, असे आवाहन त्यांनी केले.

प्रमुख अतिथी म्हणून बोलताना उपविभागीय पोलिस अधिकारी अमर मोहिते यांनी सांगितले की, विविध शासकीय योजनांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होणे ही नागरिकांसाठी मोठी संधी आहे. नागरिकांनी येथे प्रदर्शित योजनांची माहिती जाणून घेऊन त्याचा लाभ घ्यावा, असे त्यांनी आवाहन केले.

तहसीलदार किशोर बागडे यांनी आपल्या मनोगतात भामरागडसारख्या दुर्गम भागात प्रथमच अशा प्रकारे योजनांची एकत्रित माहिती उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे सांगितले. हा उपक्रम अत्यंत उपयुक्त असल्याचे नमूद करत त्यांनी प्रदर्शनाला भेट देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शाळानिहाय प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात येणार असून विजेत्यांना तहसील कार्यालयामार्फत पुरस्कार देण्यात येतील, अशी माहिती दिली.

दुर्गम भागात योजनांची माहिती पोहोचविण्याचा अभिनव उपक्रम :- 

या प्रदर्शनामध्ये सामाजिक न्याय विभागासह कृषी, आरोग्य, शिक्षण, महिला व बालविकास, आदिवासी विकास, कौशल्य विकास व रोजगार आदी विविध विभागांच्या एकूण ८५ शासकीय योजनांची माहिती मल्टिमीडिया दृकश्राव्य साधने तसेच आकर्षक फ्लेक्स पॅनलच्या माध्यमातून सादर करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना योजनांची माहिती सोप्या, स्पष्ट व प्रभावी पद्धतीने समजून घेता येत आहे.

जिल्हा माहिती अधिकारी गजानन जाधव यांनी प्रास्ताविकात सांगितले की, दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत शासकीय योजनांची माहिती पोहोचविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांच्या मार्गदर्शनानुसार तसेच जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा व जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या सूचनेनुसार भामरागड या दुर्गम भागात येथे हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

यावेळी सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे नागरिकांना या प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

लोक बिरादरी प्रकल्पाचे अनिकेत आमटे यांनी प्रदर्शनाला भेट देऊन या उपक्रमाचे कौतुक केले. भामरागडसारख्या दुर्गम आदिवासी भागात शासनाच्या विविध योजनांची माहिती उपलब्ध करून देणे ही अत्यंत सकारात्मक बाब असून या योजनांचा लाभ मिळाल्यास स्थानिक आदिवासींचे जीवनमान उंचावण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रदर्शनाला विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी, शालेय विद्यार्थी तसेच स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या उपक्रमामुळे शासनाच्या विविध योजनांची माहिती प्रत्यक्षात मिळाल्याचा सकारात्मक अभिप्राय नागरिकांनी नोंदविला.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular