VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांच्या हस्ते,
गडचिरोली ,२९ जून २०२६::- सार्वजनिक आरोग्य विभाग, जिल्हा परिषद आणि जिल्हा प्रशासन, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ आज महिला व बाल रुग्णालय, गडचिरोली येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या मोहिमेद्वारे जिल्ह्यातील ० ते ५ वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकापर्यंत पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पोहोचविण्याचा निर्धार प्रशासनाने व्यक्त केला. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, आमदार डॉ. मिलिंद नरोटे आणि गडचिरोली नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष अॅड. प्रणोती निंबोरकर यांच्या हस्ते लाभार्थी बालकांना पोलिओचे दोन थेंब पाजून करण्यात आले.
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे, प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक तथा वैद्यकीय अधीक्षक डॉ. माधुरी किलनाके, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. छाया उईके तसेच जिल्हा माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. माधव शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
मान्यवरांनी पालकांना आवाहन करताना सांगितले की, “पोलिओमुक्त भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी ० ते ५ वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला पोलिओचे दोन थेंब देणे ही प्रत्येक पालकाची जबाबदारी आहे. कोणतेही बालक या मोहिमेपासून वंचित राहू नये.”
कार्यक्रमाला महिला व बाल रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी, नर्सिंग स्कूलचे विद्यार्थी, डॉ. सचिन हेमके, डॉ. पंकज हेमके, डॉ. अमित साळवे, डॉ. प्रशांत आखाडे, पी.एच.एन. प्राती मॅडम, मृणाली रामटेके तसेच गडचिरोली नगरपरिषदेचे नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. आनंद मोडक यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. अमित साळवे यांनी मानले.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या या महत्त्वपूर्ण मोहिमेला गडचिरोली शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून, “प्रत्येक बालक सुरक्षित, प्रत्येक कुटुंब जागरूक आणि पोलिओमुक्त गडचिरोली” या संकल्पनेला बळकटी मिळत असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
