VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
विकसित गडचिरोली व्हिजन २०४७ अंतर्गत माजी आमदार डॉ. देवराव होळी यांचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन; तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश,
महाराष्ट्र /मुंबई, 10 सप्टेंबर 2026::-गडचिरोली जिल्ह्याचा भौगोलिक विस्तार आणि दुर्गम भागातील नागरिकांच्या प्रशासकीय अडचणी लक्षात घेता अहेरी येथे स्थापन करण्यात आलेल्या अपर जिल्हाधिकारी कार्यालयाला शासन नियमानुसार पूर्ण प्रशासकीय अधिकार, आवश्यक अधिकारी-कर्मचारी आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.
या संदर्भात **‘आकांक्षित जिल्हा ते विकसित गडचिरोली व्हिजन २०४७ कृती निर्माण समिती’**चे मुख्य प्रवर्तक, भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी मंत्रालय, मुंबई येथे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

अहेरी विधानसभा क्षेत्रातील अहेरी, भामरागड, सिरोंचा, एटापल्ली आणि मूलचेरा या तालुक्यांतील नागरिकांना विविध प्रशासकीय व महसूल कामांसाठी गडचिरोली येथे वारंवार जावे लागते. मोठे अंतर, दुर्गम भौगोलिक परिस्थिती आणि वाहतुकीच्या मर्यादा यामुळे नागरिकांना वेळ व आर्थिक खर्चाचा सामना करावा लागतो. ही परिस्थिती लक्षात घेऊन अहेरी येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालयाची निर्मिती करण्यात आली आहे.
मात्र, या कार्यालयाला आवश्यक अधिकार आणि पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नसल्यास कार्यालय स्थापन करण्यामागील उद्देश पूर्णपणे साध्य होणार नाही. त्यामुळे अपर जिल्हाधिकारी कार्यालयाला पूर्ण प्रशासकीय अधिकार, सक्षम अधिकारी-कर्मचारी तसेच आवश्यक पायाभूत सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी डॉ. होळी यांनी महसूल मंत्र्यांकडे केली.

डॉ. होळी यांच्या निवेदनाची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गांभीर्याने दखल घेतली. त्यांनी निवेदनावर अतिरिक्त मुख्य सचिव, महसूल विभाग यांच्याकडे तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश देत प्रकरण पुढे पाठविले. तसेच अहेरी अपर जिल्हाधिकारी कार्यालयाशी संबंधित समस्या लवकर निकाली काढण्यासाठी आवश्यक कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले.
अहेरी अपर जिल्हाधिकारी कार्यालय अधिक सक्षम झाल्यास अहेरीसह भामरागड, सिरोंचा, एटापल्ली आणि मूलचेरा या दुर्गम तालुक्यांतील नागरिकांना महसूल व इतर प्रशासकीय सेवा त्यांच्या जवळ उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार आहे.

प्रशासनाचे विकेंद्रीकरण करून दुर्गम भागातील नागरिकांना त्यांच्या जवळच प्रभावी आणि जलद शासकीय सेवा उपलब्ध करून देणे हे ‘विकसित गडचिरोली व्हिजन २०४७’चे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. अहेरी अपर जिल्हाधिकारी कार्यालयाला सक्षम केल्याने या उद्दिष्टाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडेल, असे डॉ. देवराव होळी यांनी सांगितले.
