Saturday, September 5, 2026
HomeMumbaiपत्रकारांच्या आरोग्यासाठी शासनाची विशेष पुढाकार; विधानभवनात ८९२ पत्रकारांची आरोग्य तपासणी...

पत्रकारांच्या आरोग्यासाठी शासनाची विशेष पुढाकार; विधानभवनात ८९२ पत्रकारांची आरोग्य तपासणी…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकारांच्या आरोग्याची आस्थेने विचारपूस; वर्षभर वैद्यकीय मदतीसाठी स्वतंत्र नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती,

महाराष्ट्र /मुंबई, 04 सप्टेंबर 2026::- पत्रकारांचे काम हे अनियमित वेळांचे आणि सतत धावपळीचे असल्याने त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असते. पत्रकारांना तंदुरुस्त ठेवण्यासाठी नियमित आरोग्य तपासणी आणि वेळेवर उपचार आवश्यक असून, याच उद्देशाने विधानभवन येथे आयोजित करण्यात आलेले विशेष आरोग्य तपासणी व उपचार शिबीर महत्त्वपूर्ण ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मुख्यमंत्री सहायता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष यांच्या समन्वयाने विधानभवन येथे पत्रकारांसाठी विशेष आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिबिराला भेट देत विविध वैद्यकीय विभागांची पाहणी केली तसेच पत्रकारांची आस्थेने विचारपूस केली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर, विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर, आमदार योगेश सागर, आमदार अभिमन्यू पवार यांच्यासह विविध पत्रकार संघटनांचे पदाधिकारी आणि पत्रकार उपस्थित होते.

२४ तासांच्या धावपळीच्या कामाचा आरोग्यावर परिणाम :-

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पत्रकारांचे काम निश्चित वेळेपुरते मर्यादित नसते. दिवस-रात्र, अनेकदा तासनतास रस्त्यावर किंवा घटनास्थळी राहून त्यांना वार्तांकन करावे लागते. त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. नियमित आरोग्य तपासणी न झाल्याने अनेक आजारांचे निदान उशिरा होते. अशा शिबिरांमधून आजारांची प्राथमिक लक्षणे वेळीच ओळखून आवश्यक उपचार सुरू करता येतील.

शिबिरामध्ये विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ डॉक्टर, नामांकित वैद्यकीय संस्था आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. पत्रकारांसोबतच दीर्घकाळ उभे राहून काम करणाऱ्या कॅमेरामनसाठीही प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या. व्हेरिकोज व्हेन्ससारख्या समस्यांसाठी स्टॉकिंगची सुविधा तसेच आपत्कालीन परिस्थितीत उपयोगी ठरणाऱ्या वैद्यकीय सुविधांचाही समावेश करण्यात आला होता.

पत्रकार व कुटुंबीयांसाठी स्वतंत्र नोडल अधिकारी :-

पत्रकारांच्या सर्व संघटनांनी एकत्र येऊन हा उपक्रम राबविल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी संघटनांचे अभिनंदन केले. आजारपणाच्या प्रसंगी पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांना आवश्यक उपचार, शस्त्रक्रिया तसेच वैद्यकीय समन्वयासाठी मदत मिळावी, यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये स्वतंत्र नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आला आहे.

हा उपक्रम केवळ एका दिवसापुरता मर्यादित न ठेवता पत्रकारांना वर्षभर आरोग्यविषयक आवश्यक मदत आणि मार्गदर्शन मिळावे, यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

६०० तज्ज्ञ डॉक्टरांचा सहभाग; ८९२ जणांची तपासणी :-

मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांच्या पुढाकाराने आयोजित या शिबिरात विविध वैद्यकीय विभागांतील तज्ज्ञ डॉक्टरांनी पत्रकारांची सर्वसमावेशक आरोग्य तपासणी केली.

न्यूरोलॉजिस्ट तथा महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्यंकट गीते, जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय भंडारवार, पुणे बी.जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार, ज्येष्ठ नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. तात्यासाहेब लहाने, पोटविकार तज्ज्ञ डॉ. अमित मायदेव, लठ्ठपणा निवारण तज्ज्ञ डॉ. जयश्री तोडकर, यकृत प्रत्यारोपण व पोटविकार तज्ज्ञ डॉ. विभा वर्मा, हृदयरोगतज्ज्ञ डॉ. कल्याण मुंडे, जनरल मेडिसिन तज्ज्ञ डॉ. मधुकर गायकवाड यांच्यासह विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ डॉक्टरांनी पत्रकारांना तपासणीसह आरोग्यविषयक मार्गदर्शन केले.

प्राथमिक तपासणी, नेत्ररोग, त्वचारोग, हृदयरोग, स्त्रीरोग, फिजिओथेरपी, जनरल मेडिसिन, अस्थिरोग, कर्करोग, रक्त तपासणी, श्वसनविकार, पोट व पचनसंस्थेचे विकार, कान-नाक-घसा, मानसिक आरोग्य, वजन नियंत्रण, औषध वितरण, आयव्हीएफ व वंध्यत्व उपचार, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग तपासणी यांसह विविध वैद्यकीय सुविधा शिबिरात उपलब्ध होत्या. दंतचिकित्सा, कर्करोग आणि नेत्ररोग तपासणीसाठी स्वतंत्र विभागही ठेवण्यात आले होते.

विविध रुग्णालयांतील तज्ज्ञांचा सहभाग :-

जे.जे. रुग्णालय, जी.टी. रुग्णालय, सेंट जॉर्ज, कामा रुग्णालय, शासकीय दंत महाविद्यालय, आर.ए. पोदार, के.जी. मित्तल, मुंबादेवी रुग्णालय, कूपर रुग्णालय, नायर, बॉम्बे हॉस्पिटल, हिंदुजा हॉस्पिटल, रिलायन्स रुग्णालय आणि सेफी रुग्णालयासह मनपा रुग्णालयांतील विविध आजारांवरील सुमारे ६०० तज्ज्ञ डॉक्टर व वैद्यकीय कर्मचारी या शिबिरात सहभागी झाले होते.

सकाळी ९ ते सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत चाललेल्या या शिबिरात सुमारे ८९२ पत्रकार व इतरांची आरोग्य तपासणी करून औषधोपचार करण्यात आले. आवश्यकतेनुसार काही पत्रकारांना पुढील उपचारांसाठी शासकीय रुग्णालयात संदर्भित करण्यात आले.

विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे आणि विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनीही शिबिरातील विविध विभागांना भेट देऊन डॉक्टर, वैद्यकीय पथक आणि पत्रकारांशी संवाद साधला.

मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, मुंबई मराठी पत्रकार संघ, प्रेस क्लब, टेलिव्हिजन जर्नालिस्ट असोसिएशन, मुंबई हिंदी पत्रकार संघ, मुंबई क्राईम रिपोर्टर्स असोसिएशन, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, बॉम्बे न्यूज फोटोग्राफर असोसिएशन, बृहन्मुंबई महानगरपालिका वार्ताहर संघ, व्हॉइस ऑफ मीडिया आणि पत्रकार विकास संघ आदी संस्थांचे पदाधिकारी व पत्रकार यावेळी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular