Thursday, August 6, 2026
HomeMumbaiगडचिरोलीत पिंजरा पद्धतीच्या मत्स्य प्रकल्पाची मागणी...

गडचिरोलीत पिंजरा पद्धतीच्या मत्स्य प्रकल्पाची मागणी…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

रोजगार निर्मितीसाठी DMF निधीचा वापर करण्याची डॉ. देवराव होळी यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी,

महाराष्ट्र/मुंबई,०६ ऑगस्ट २०२६::- गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देतानाच मत्स्य व्यवसायाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी पिंजरा (केज कल्चर) पद्धतीच्या मत्स्य उत्पादन प्रकल्पास जिल्हा खनिज प्रतिष्ठान (DMF) निधीतून तातडीने मंजुरी द्यावी, अशी मागणी भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

मुंबईतील मंत्रालयात मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेऊन डॉ. होळी यांनी सविस्तर निवेदन सादर केले. गडचिरोली जिल्ह्यात धरणे, तलाव आणि जलाशयांची विपुल उपलब्धता असूनही मत्स्य व्यवसायाच्या माध्यमातून रोजगारनिर्मितीची क्षमता अद्याप पूर्णपणे वापरली गेलेली नाही. त्यामुळे आधुनिक पिंजरा पद्धतीने मत्स्य उत्पादन वाढवून जिल्ह्यात आर्थिक विकासाला गती देण्याची गरज असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले.

डॉ. होळी यांनी सांगितले की, DMF निधीचा प्रभावी वापर करून हा प्रकल्प राबविल्यास आदिवासी युवक, ग्रामीण भागातील बेरोजगार, महिला बचतगट तसेच मत्स्य व्यवसायाशी संबंधित लाभार्थींना मोठ्या प्रमाणात स्वयंरोजगार उपलब्ध होईल. परिणामी जिल्ह्यातील मत्स्य उत्पादन वाढून स्थानिक बाजारपेठेला चालना मिळेल आणि ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक सक्षम होईल.

खनिज संपत्तीने समृद्ध असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधीचा उपयोग केवळ पायाभूत सुविधांपुरता मर्यादित न ठेवता रोजगाराभिमुख आणि उत्पन्नवाढीच्या प्रकल्पांसाठी करण्यात यावा, अशी भूमिकाही त्यांनी यावेळी मांडली.

पिंजरा पद्धतीच्या मत्स्य उत्पादनासाठी आवश्यक पायाभूत सुविधा, प्रशिक्षण, तांत्रिक मार्गदर्शन आणि आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिल्यास जिल्ह्यात मत्स्य उत्पादनात लक्षणीय वाढ होईल. यामुळे स्थानिक युवकांचे स्थलांतर कमी होऊन ग्रामीण भागात शाश्वत रोजगार निर्माण होईल, असा विश्वास डॉ. होळी यांनी व्यक्त केला.

दरम्यान, गडचिरोलीच्या सर्वांगीण विकासासाठी DMF निधीचा प्रभावी आणि लोकाभिमुख वापर करण्याच्या दृष्टीने या प्रस्तावाला सकारात्मक मान्यता देऊन संबंधित विभागाला तातडीने कार्यवाहीचे निर्देश द्यावेत, अशी विनंतीही डॉ. देवराव होळी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular