Wednesday, September 16, 2026
HomeChamorshiवेळेवर निराधार पेन्शन द्या, तालुकास्तरावर 'सिंगल विंडो' सुविधा सुरू करा...

वेळेवर निराधार पेन्शन द्या, तालुकास्तरावर ‘सिंगल विंडो’ सुविधा सुरू करा…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

चामोर्शी प्रेस क्लबचे तहसीलदारांना निवेदन,

गडचिरोली/चामोर्शी,१६ जुलै २०२६::- संजय गांधी राष्ट्रीय निराधार अनुदान योजनेंतर्गत लाभ घेणाऱ्या वृद्ध, विधवा, दिव्यांग, निराधार महिला व इतर पात्र लाभार्थ्यांना नियमित व वेळेवर पेन्शन मिळावी, तसेच त्यांच्या विविध शासकीय कामांसाठी तालुका स्तरावर ‘सिंगल विंडो सिस्टीम’ सुरू करण्यात यावी, अशी मागणी चामोर्शी प्रेस क्लबने तहसीलदार, चामोर्शी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली.

निवेदनात म्हटले आहे की, निराधार योजनेतील अनेक लाभार्थी आर्थिकदृष्ट्या अत्यंत दुर्बल असून पेन्शन वेळेवर न मिळाल्यामुळे त्यांच्या दैनंदिन उदरनिर्वाहासह औषधोपचार व इतर आवश्यक खर्च भागविणे कठीण होत आहे. तसेच केवायसी (KYC), डीबीटी (DBT), आधार पडताळणी, बँक खाते अद्ययावत करणे आदी कामांसाठी लाभार्थ्यांना वारंवार तहसील कार्यालयात फेऱ्या माराव्या लागत असून ग्रामीण भागातील नागरिकांना यासाठी आर्थिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे.

प्रेस क्लबने प्रशासनाकडे दर महिन्याच्या १ ते ५ तारखेच्या दरम्यान सर्व पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात नियमित पेन्शन जमा करण्याची मागणी केली आहे. प्रलंबित पेन्शन तातडीने वितरित करावी, तसेच तहसील कार्यालयात ‘सिंगल विंडो सिस्टीम’ सुरू करून केवायसी, डीबीटी, आधार पडताळणी, बँक खाते अद्ययावत करणे आदी सर्व कामे एकाच ठिकाणी पूर्ण करण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

याशिवाय ग्रामीण भागातील लाभार्थ्यांसाठी दर महिन्याला गावागावांत विशेष शिबिरे आयोजित करावीत, प्रलंबित अर्जांची तातडीने पडताळणी करून मंजुरी द्यावी, शासनाकडून मिळणारा निधी वेळेत उपलब्ध करून लाभार्थ्यांना नियमित लाभ मिळेल यासाठी आवश्यक प्रशासकीय कार्यवाही करावी, तसेच निराधार योजनांशी संबंधित तक्रारींच्या निवारणासाठी तहसील कार्यालयात स्वतंत्र तक्रार निवारण कक्ष सुरू करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

समाजातील वंचित व गरजू घटकांना शासनाच्या योजनांचा लाभ कोणत्याही विलंबाशिवाय मिळावा, यासाठी प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेत तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा चामोर्शी प्रेस क्लबचे अध्यक्ष विनोदजी खोबे, धनराज वासेकर, श्रावण वाकोडे, नितेश गट्टीवार, हस्ते भगत, मारोती बारसागडे, अरुण गव्हारे, पुंडलिक भांडेकर, पप्पू कोटंगले व्यक्त केली आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular