Tuesday, July 28, 2026
HomeChamorshiचामोर्शी बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेत ५० हजारांची चोरी...

चामोर्शी बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेत ५० हजारांची चोरी…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

नागरिकांच्या सतर्कतेमुळे आरोपी महिला रंगेहाथ जेरबंद.

गडचिरोली /चामोर्शी,२२ जुलै २०२६::- चामोर्शी बसस्थानकावर एसटी बसमध्ये चढण्यासाठी झालेल्या गर्दीचा फायदा घेत महिला बचत गटाच्या सचिवेच्या पर्समधून ५० हजार रुपयांची रोकड लंपास करण्याचा प्रयत्न एका महिलेने केला. मात्र, फिर्यादीच्या सतर्कतेसोबतच उपस्थित नागरिकांच्या तत्परतेमुळे आरोपी महिलेला घटनास्थळीच पकडण्यात आले. तिच्या ताब्यातून चोरीस गेलेली ५० हजार रुपयांची संपूर्ण रोकड हस्तगत करण्यात आली असून, या प्रकरणी चामोर्शी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, निराशा जितेंद्र कांबळे (वय ३०, रा. हळदी माल, ता. चामोर्शी) या एकता स्वयं सहाय्यता समूहाच्या सचिव आहेत. दि. २० जुलै २०२६ रोजी दुपारी सुमारे १ वाजताच्या सुमारास त्या महिला बचत गटाच्या अध्यक्षांसह चामोर्शी येथील बँक ऑफ इंडिया शाखेतून गटातील महिला सदस्यांना शेतीकामासाठी वाटप करण्यासाठी १ लाख रुपये काढून हळदीचक येथे जाण्यासाठी चामोर्शी बसस्थानकावर बसची वाट पाहत होत्या.

दरम्यान, एसटी बस आल्यानंतर बसमध्ये चढण्यासाठी प्रवाशांची गर्दी झाली. याच संधीचा फायदा घेत सकीना सेहवाग मानकर (वय २८, रा. बामणी, ता. उमरेड, जि. नागपूर) हिने फिर्यादीच्या पर्सची चैन उघडून आत ठेवलेल्या १ लाख रुपयांपैकी ५० हजार रुपयांची रोकड चोरल्याचा आरोप आहे.

मात्र, काही क्षणातच फिर्यादींना संशय आल्याने त्यांनी तत्काळ आरडाओरड केली. उपस्थित प्रवासी व नागरिकांनी तातडीने संबंधित महिलेला ताब्यात घेत तिची तपासणी केली. तपासणीदरम्यान तिच्याकडून चोरीस गेलेली ५० हजार रुपयांची संपूर्ण रोकड जप्त करण्यात आली. त्यामुळे आरोपीचा चोरीचा डाव घटनास्थळीच उधळला गेला.

या घटनेप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून चामोर्शी पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. ३७१/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ३०३(२) नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

या गुन्ह्याचा पुढील तपास महिला पोलीस अंमलदार लिला ताडाम करीत असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

गर्दीच्या ठिकाणी चोरट्यांकडून अशा प्रकारच्या घटना घडत असल्याने प्रवाशांनी बसस्थानक, रेल्वे स्थानक तसेच सार्वजनिक ठिकाणी आपल्या रोकड, दागिने व मौल्यवान वस्तूंबाबत विशेष दक्षता बाळगावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular