VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
अनेक मार्ग बंद, महाराष्ट्र ग्रामीण बँकेत शिरले पाणी,
गडचिरोली/कुनघाडा, ३० जुलै २०२६::- गडचिरोली जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार मुसळधार पावसाने चामोर्शी व गडचिरोली तालुक्यातील जनजीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे. चामोर्शी तालुक्यातील कुनघाडा रै, पाविमुरांडा तसेच गडचिरोली तालुक्यातील पोटेगाव परिसरात अनेक गावांना पुराचा वेढा पडला असून लहान-मोठे रस्ते, पूल व नाले पाण्याखाली गेल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. शेतजमिनी जलमय झाल्याने रोवणीची कामेही संकटात सापडली आहेत.
कुनघाडा रै परिसरातील मुरमुरी नाला, येडानूर नाला, ठिकाणी नाला, पुसेर–मुतनूर नाला यांसह अनेक सखल मार्गांवरून पाण्याचा प्रचंड वेगाने प्रवाह सुरू आहे. त्यामुळे या मार्गांवरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. कुथेगाव–पोहार नदीच्या पुलावरून पाणी वाहत असून गावातही पुराचे पाणी शिरल्याने गावाचा बाहेरील संपर्क तुटला आहे.
दुसरीकडे गडचिरोली तालुक्यातील देवापूर नाका, पोटेगाव–गवळहेटी मार्ग, भेंडीकन्हार आणि थाटरी नाला येथेही पाण्याची पातळी धोकादायकरीत्या वाढली आहे. परिणामी गडचिरोली–पोटेगाव–घोट तसेच गिलगाव–पोटेगाव हे महत्त्वाचे मार्ग बंद पडले असून नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.
सततच्या पावसामुळे शेकडो एकर शेती पुराच्या पाण्याखाली गेली आहे. रोवणीच्या हंगामातच पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात असून शेतकरी हवालदिल झाले आहेत.
ग्रामीण बँकेत घुसले पाणी; आर्थिक व्यवहार ठप्प :-
मुसळधार पावसाचा फटका कुनघाडा रै येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेलाही बसला आहे. गावातील पाण्याचा योग्य निचरा न झाल्याने पावसाचे पाणी थेट बँकेच्या मुख्य कार्यालयात शिरले. बँकेतील महत्त्वाची कागदपत्रे, संगणक आणि फर्निचरचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली असून सुरक्षिततेच्या कारणास्तव ३० जुलै रोजी बँकेचे सर्व आर्थिक व्यवहार बंद ठेवण्यात आले.
यामुळे परिसरातील शेतकरी, व्यापारी, महिला बचत गट आणि सर्वसामान्य ग्राहकांना मोठा फटका बसला आहे. एकीकडे रस्ते बंद, दुसरीकडे बँक सेवा ठप्प झाल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.
दरम्यान, पावसाचा जोर कायम असल्याने पूरस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नागरिकांनी विनाकारण पूरग्रस्त मार्गांवर जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत असून पूरग्रस्त भागात तातडीने मदतकार्य, जलनिस्सारण व्यवस्था आणि नुकसानग्रस्तांना दिलासा देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
