VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
सामदा जंगलातील घटना; वनविभागाकडून घटनास्थळी पाहणी,
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण,
चंद्रपूर/सावली,०१ ऑगस्ट २०२६::- चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात ७५ वर्षीय गुराख्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी (१ ऑगस्ट) उघडकीस आली. सामदा जंगल परिसरात घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, मानव–वाघ संघर्षाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हिरामण मार्कहांडी साखरे (वय ७५, रा. सामदा, ता. सावली) हे नेहमीप्रमाणे गुरे चारण्यासाठी जंगल परिसरात गेले होते. यावेळी सावली वनपरिक्षेत्रातील व्याहाड राऊंड अंतर्गत येणाऱ्या सामदा बीटच्या कंपार्टमेंट क्रमांक १५०१ मध्ये दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. या भीषण हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती शनिवारी दुपारी सुमारे १.५० वाजता वनविभागाला मिळताच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा व पाहणी सुरू केली. प्राथमिक तपासात हा मृत्यू वाघाच्या हल्ल्यात झाल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती वनविभागाने दिली.
या घटनेनंतर सामदा व परिसरातील गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. जंगलालगत राहणारे शेतकरी, गुराखी आणि मजूर यांच्यात चिंतेचे वातावरण असून, जंगलात जाणाऱ्या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
दरम्यान, मृताच्या कुटुंबीयांना शासनाच्या नियमानुसार आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच परिसरात वाघाचा वावर लक्षात घेता वनविभागाने गस्त वाढवून आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशीही मागणी नागरिकांकडून होत आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे पुन्हा एकदा मानव–वन्यजीव संघर्षाचा गंभीर प्रश्न समोर आला असून, वनविभागाच्या पुढील कारवाईकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.
