VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
60 लाखांचा अवैध सागवन साठा जप्त,
गडचिरोली /एटापल्ली,०३ ऑगस्ट २०२६::- गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात वन विभागाने अवैध सागवान तस्करीविरोधात मोठी कारवाई करत सुमारे 60 लाख रुपये किमतीचा सागवान लाकडाचा साठा जप्त केला आहे. या कारवाईमुळे अवैध वृक्षतोड आणि सागवान तस्करी करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
गोपनीय माहितीच्या आधारे वन विभागाच्या पथकाने नियोजनबद्ध छापा टाकत मोठ्या प्रमाणात सागवान लाकूड हस्तगत केले. प्राथमिक तपासानुसार हा साठा अवैधरित्या साठवून पुढील विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. जप्त करण्यात आलेल्या सागवानाची अंदाजे किंमत सुमारे 60 लाख रुपये असल्याचे वन विभागाने सांगितले.

या प्रकरणी संबंधितांविरुद्ध वन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, सागवान तस्करीच्या संपूर्ण रॅकेटचा शोध घेण्यासाठी तपासाची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. या कारवाईत आणखी काही संशयितांची नावे समोर येण्याची शक्यता असून, वन विभागाकडून चौकशी सुरू आहे.

गडचिरोलीसारख्या वनसंपन्न जिल्ह्यात सागवानाच्या अवैध तस्करीवर आळा घालण्यासाठी वन विभागाने कठोर भूमिका घेतली असून, अशा प्रकारच्या कारवाया भविष्यातही सातत्याने सुरू राहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
वन विभागाच्या या धडक कारवाईचे सर्व स्तरांतून स्वागत होत असून, जंगलसंपत्तीचे संरक्षण आणि अवैध वृक्षतोड रोखण्यासाठी ही कारवाई महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
