VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
डॉ. प्रणय खुणे यांच्या पाठपुराव्याला यश; जिल्हा परिषदेकडून मागणीची दखल, बोरवेललाही मंजुरी,
गडचिरोली/चामोर्शी,(घोट ) १० ऑगस्ट २०२६ ::-निसर्गसौंदर्याची देणगी लाभलेल्या नवनीत ग्राम पहाडीच्या विकासाचा प्रश्न आता प्रशासनाच्या दारात पोहोचला असून, या पर्यटनस्थळाच्या सर्वांगीण विकासासाठी हालचालींना वेग आला आहे. भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डॉ. प्रणय भाऊ खुणे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याची जिल्हा परिषद गडचिरोलीने दखल घेतली असून, यासंदर्भातील पत्र पंचायत समिती चामोर्शीकडे पाठविण्यात आले आहे.
नवनीत ग्राम पहाडी येथे श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या नवनीत ग्राम शाखेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात डॉ. प्रणय खुणे यांनी परिसराची पाहणी करून स्थानिक गुरुदेव भक्त व नागरिकांकडून विविध समस्या जाणून घेतल्या. यावेळी नवनीत ग्राम पहाडीला ‘क’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा मिळणे ही विकासाची पहिली पायरी ठरेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
परिसरातील पाणी, पर्यटन सुविधा, मूलभूत सोयी-सुविधा आणि आवश्यक विकासकामांचा प्रत्यक्ष आढावा घेतल्यानंतर डॉ. खुणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. मिलिंद भाऊ नरोटे तसेच वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवरून चर्चा करून पहाडीच्या विकासासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत पाठपुरावा करण्यात आला.
विशेष म्हणजे, डॉ. प्रणय खुणे यांच्या मागणीची दखल घेत आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी नवनीत ग्राम पहाडी परिसरात बोरवेल मंजूर केली आहे. त्यामुळे परिसरातील पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात मार्गी लागण्याची अपेक्षा आहे.
राष्ट्रसंतांच्या विचारांना विकासाची जोड :-

कार्यक्रमात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांवरही डॉ. खुणे यांनी प्रकाश टाकला. राष्ट्रसंतांचे विचार आजच्या समाजासाठी तितकेच प्रेरणादायी असून, त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी प्रत्येकाने योगदान देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
याच परिसरात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुतळ्यासाठी जागेचे उद्घाटन डॉ. खुणे यांच्या हस्ते करण्यात आले होते. आता त्या ठिकाणी राष्ट्रसंतांच्या पुतळ्याची स्थापना करण्यात आली आहे.
विकासासाठी भाजपचा पाठपुरावा कायम :-

नवनीत ग्राम पहाडीच्या विकासासाठी जिल्हा परिषदेकडे करण्यात आलेल्या मागणीची प्रशासनाने दखल घेतल्याने स्थानिक नागरिक व गुरुदेव भक्तांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. नवनीत ग्राम पहाडीला पर्यटनाच्या नकाशावर आणण्यासाठी तसेच स्थानिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी भारतीय जनता पार्टी सातत्याने पाठपुरावा करणार, असा विश्वास डॉ. प्रणय खुणे यांनी व्यक्त केला.
यावेळी मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी, जिल्हा उपाध्यक्ष नानु भाऊ उपाध्ये, विदर्भ केसरीचे जिल्हा प्रतिनिधी फुलचंद वाघाडे, दिनेश मुजुमदार, संदीप भोवरे, प्रवीण गेडाम, पलाश घरामी, रमेश लेकलवार, श्री गुरुदेव सेवा मंडळाचे विश्वस्त नोनीगोपाल हलदर यांच्यासह नवनीत ग्राम पहाडी व ग्रामपंचायत हळदवाही अंतर्गत विविध गावांतील गुरुदेव भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
