Sunday, September 6, 2026
HomeGadchiroliगडचिरोलीच्या विकासाचा २०४७ पर्यंतचा रोडमॅप ठरणार!...

गडचिरोलीच्या विकासाचा २०४७ पर्यंतचा रोडमॅप ठरणार!…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

‘आकांक्षित जिल्हा ते विकसित गडचिरोली’ व्हिजन २०४७ कार्यशाळेचा दिमाखदार समारोप,

उद्योग, रोजगार, कृषी, आरोग्य, पर्यटन व आदिवासी विकासावर तज्ज्ञांचे मंथन,

गडचिरोली ,१७ ऑगस्ट २०२६ ::- गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाला दीर्घकालीन आणि व्यापक दिशा देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘आकांक्षित जिल्हा ते विकसित गडचिरोली व्हिजन २०४७’ या दोन दिवसीय कार्यशाळेचा सोमवारी (दि. १७) आर. के. सेलिब्रेशन हॉल येथे उत्साहपूर्ण वातावरणात दिमाखदार समारोप झाला. जिल्ह्याच्या भविष्यातील विकासाचा आराखडा कसा असावा, स्थानिक संसाधनांचा योग्य वापर करून रोजगारनिर्मिती कशी वाढवावी आणि गडचिरोलीला २०४७ पर्यंत विकसित, आत्मनिर्भर व सर्वसमावेशक जिल्हा कसे बनवावे, यावर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सखोल विचारमंथन केले.

या दोन दिवसीय मंथनातून गडचिरोलीच्या विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण संकल्पना, सूचना आणि उपाययोजना पुढे आल्या असून, त्या ‘व्हिजन २०४७’च्या व्यापक आराखड्यासाठी दिशादर्शक ठरणार आहेत.

विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती :-

समारोपीय कार्यक्रमाला अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मरावबाबा आत्राम, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे OSD अनिरुद्ध पालकर, सुमित मित्रा, माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी आणि शिवसेना शिंदे पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख हेमंत जंबेवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

राजकीय मतभेद बाजूला ठेवून जिल्ह्याच्या विकासासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर एकाच व्यासपीठावर आल्याने कार्यशाळेला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

उद्योग-रोजगारापासून आरोग्य व कृषीपर्यंत व्यापक चर्चा :-

कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी ओम साई माईन्सचे अध्यक्ष सतीश मोहंती, अखिल भारतीय SC/ST विकास परिषदेचे प्रदेश सचिव अमोल कुळमेथे, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे जिल्हा महासचिव उमेश उईके, ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’चे डॉ. सतीश गोगुलवार आणि प्रोव्हीया ग्रुप बंगळुरूचे विकास जैन यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.

तसेच अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या महिला जिल्हाध्यक्ष पुष्पलता कुमरे, जिल्हा सचिव विद्या दुग्गा, शहर अध्यक्ष आरती कोल्हे, जिल्हा कौशल्य विकास विभागाच्या प्रियांका इडपात्रे, मत्स्य विभागाचे सहआयुक्त समीर डोंगरे, जिल्हा कृषी विभागाचे आनंद कांबळे, शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाचे प्रवीण काळबांधे, नेहरू युवा केंद्राचे माजी संचालक मनोहर हेपट, दैनिक आदिवासी माणूसचे संपादक सुरेश पद्मशाली आणि जिल्हा उद्योग केंद्राचे धुळा कुळाल यांनीही विकासाच्या विविध पैलूंवर आपली मते मांडली.

यावेळी उद्योगनिर्मिती, स्थानिक रोजगार, कृषी प्रक्रिया उद्योग, आरोग्य सुविधा, मत्स्य व्यवसाय, कौशल्य विकास, पर्यटन, महिला सक्षमीकरण, आदिवासी विकास, स्थानिक उद्योग, नैसर्गिक साधनसंपत्तीचे संवर्धन आणि पायाभूत सुविधा या विषयांवर सखोल चर्चा झाली.

‘स्थानिक युवकांना रोजगार देणे ही विकासाची खरी दिशा’ :-

गडचिरोलीतील नैसर्गिक व मानवी संसाधनांचा प्रभावी वापर करून स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती करण्याची गरज यावेळी अधोरेखित करण्यात आली. जिल्ह्यातील युवकांना रोजगारासाठी मोठ्या शहरांकडे स्थलांतर करण्याची वेळ येऊ नये, यासाठी स्थानिक उद्योग, कौशल्य विकास, कृषीपूरक व्यवसाय आणि प्रक्रिया उद्योगांना चालना देणे आवश्यक असल्याचे मत विविध वक्त्यांनी व्यक्त केले.

त्याचबरोबर शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड, सिंचनाच्या सुविधा, मत्स्य व्यवसायाचा विस्तार, आरोग्य यंत्रणा बळकट करणे, दुर्गम व आदिवासी भागातील मूलभूत सुविधांचा विकास आणि पर्यटनाच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती करण्यावरही भर देण्यात आला.

‘व्हिजन २०४७ जनतेच्या सहभागातूनच साकारले पाहिजे’ — डॉ. देवराव होळी :-

कार्यशाळेचे मुख्य प्रवर्तक माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी समारोपप्रसंगी गडचिरोलीच्या विकासासाठी जनतेचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याचे स्पष्ट केले.

“गडचिरोलीला केवळ आकांक्षित जिल्हा म्हणून पाहण्याची मानसिकता बदलून २०४७ पर्यंत विकसित, आत्मनिर्भर, रोजगारक्षम, आधुनिक आणि सर्वसमावेशक जिल्हा उभारण्याचे लक्ष्य ठेवले पाहिजे. या विकास प्रक्रियेत आदिवासी, शेतकरी, महिला, युवक, कामगार, उद्योजक आणि ग्रामीण नागरिकांच्या अपेक्षा केंद्रस्थानी असणे आवश्यक आहे,” अशी भूमिका त्यांनी मांडली.

जिल्ह्याची जंगल, जमीन आणि जलसंपदा ही विकासाची मोठी ताकद आहे. मात्र विकास करताना पर्यावरण व नैसर्गिक साधनसंपत्तीचे संवर्धनही तितकेच महत्त्वाचे आहे, असे सांगत रोजगार आणि उद्योगविकासाला पर्यावरणपूरक दिशेने चालना देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

कार्यशाळेत मांडण्यात आलेल्या सर्व सूचना, संकल्पना आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या मतांचा सखोल विचार करून ‘विकसित गडचिरोली व्हिजन २०४७’चा व्यापक विकास आराखडा तयार करण्यासाठी पुढील दिशा निश्चित केली जाईल, असेही डॉ. होळी यांनी सांगितले.

मान्यवरांचा शाल, पुष्पगुच्छ व डायरी देऊन सत्कार :-

कार्यशाळेत मार्गदर्शन करणाऱ्या मान्यवरांचा माजी आमदार डॉ. देवराव होळी व त्यांच्या टीमच्या वतीने शाल, पुष्पगुच्छ व डायरी देऊन सत्कार करण्यात आला. कार्यशाळेला उपस्थित राहून जिल्ह्याच्या विकासासाठी मौलिक सूचना मांडणाऱ्या सर्व मान्यवर, अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांचे आयोजकांच्या वतीने आभार मानण्यात आले.

कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी पदाधिकाऱ्यांचे परिश्रम :-

कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी अखिल भारतीय SC/ST विकास परिषदेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉ. नरेंद्र उंदीरवाडे, प्रदेश सचिव अमोल कुळमेथे, जिल्हा महासचिव अश्विनी आत्राम यांच्यासह संपूर्ण पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

तसेच अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद गडचिरोलीच्या महिला जिल्हाध्यक्ष पुष्पलता कुमरे, जिल्हा सचिव विद्या दुग्गा, तालुका अध्यक्ष लिना कोकोडे, जिल्हा सहसचिव रेखा तोडासे, तनुजा कुमरे, शहर अध्यक्ष आरती कोल्हे, सचिव रोहिणी मसराम, जिल्हा महासचिव उमेश उईके, जिल्हा सचिव सुरज मडावी, शहर अध्यक्ष निलेश आत्राम, सचिव श्याम सलामे यांच्यासह त्यांच्या संपूर्ण पदाधिकाऱ्यांनी योगदान दिले.

याशिवाय राकेश भैसारे, सुनील सोरते, अनिल प्रिसीगलवार, दिलीप नैताम यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी आयोजनासाठी मेहनत घेतली. कार्यशाळेचे संचालन विजय शेंडे व उमेश उईके यांनी केले.

विकसित गडचिरोली’च्या नव्या पर्वाची नांदी :-

दोन दिवसांच्या या कार्यशाळेत जिल्ह्याच्या विकासातील अडथळे, उपलब्ध संसाधने, भविष्यातील संधी आणि अपेक्षित विकासाची दिशा यावर व्यापक चर्चा झाली. शिक्षण, आरोग्य, रोजगार, उद्योग, कृषी, सिंचन, मत्स्य व्यवसाय, पर्यटन, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरण आणि आदिवासी विकास या क्षेत्रांना गती देण्यासोबतच स्थानिक नागरिकांचे हक्क व नैसर्गिक साधनसंपत्तीचे संरक्षण करण्यावरही विशेष भर देण्यात आला.

विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, अधिकारी, तज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संघटनांचे पदाधिकारी यांनी एकत्र येऊन गडचिरोलीच्या भवितव्याचा विचार केल्याने ही कार्यशाळा केवळ चर्चेपुरती मर्यादित न राहता जिल्ह्याच्या विकासाचा कृतीआराखडा घडविण्याच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल ठरली.

‘आकांक्षित जिल्हा ते विकसित गडचिरोली’ या संकल्पनेतून २०४७ पर्यंत समृद्ध, सक्षम, रोजगारक्षम आणि सर्वसमावेशक गडचिरोली उभारण्याचा संकल्प या कार्यशाळेत करण्यात आला. जनतेच्या सहभागातून आकाराला येणारे ‘व्हिजन २०४७’ हे जिल्ह्याच्या विकासाचे दिशादर्शक ठरून गडचिरोलीच्या नव्या विकासपर्वाची नांदी ठरेल, असा विश्वास समारोपप्रसंगी व्यक्त करण्यात आला.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular