VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
प्रभावित गावांच्या अटी-शर्ती मान्य करून कंपनी, प्रशासन व ग्रामस्थांची संयुक्त खुली बैठक घेण्याची मागणी,
गडचिरोली /एटापल्ली, 06 सप्टेंबर 2026::-तालुक्यातील जवेली खुर्द ग्रामपंचायत अंतर्गत पीपली (बुर्गी) परिसरात प्रस्तावित असलेल्या ओम साई राम प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या प्रकल्पावरून स्थानिक ग्रामस्थांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. प्रकल्पामुळे प्रभावित होणाऱ्या गावांतील नागरिकांच्या अटी-शर्ती मान्य करून कंपनी, प्रशासन आणि ग्रामस्थांची संयुक्त खुली व पारदर्शक बैठक घेण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
या मागणीसाठी पीपली, बुर्गी, जवेली खुर्द, जिजावंडी, वेलमागड आदी परिसरातील ग्रामस्थांनी अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री आणि माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांची भेट घेतली. यावेळी ग्रामस्थांनी आपल्या विविध समस्या व मागण्यांचे निवेदन सादर करून स्थानिकांना न्याय मिळवून देण्यासाठी हस्तक्षेप करण्याची विनंती केली.
तसेच ग्रामस्थांनी तहसीलदार, एटापल्ली यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जिल्हाधिकारी यांनाही निवेदन सादर केले आहे.
ग्रामस्थांकडून गंभीर आरोप :-

कंपनीच्या प्रस्तावासाठी ग्रामसभेचा ठराव मिळविताना काही मोजक्या व्यक्तींमार्फत आर्थिक प्रलोभने देऊन तसेच दिशाभूल करून ग्रामस्थांची फसवणूक केली जात असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. त्यामुळे प्रकल्पासंदर्भातील सर्व बाबी ग्रामस्थांसमोर स्पष्टपणे मांडून निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
पीपली, बुर्गी, जवेली खुर्द, जिजावंडी, वेलमागड यांसह परिसरातील अनेक गावांवर प्रस्तावित प्रकल्पाचा परिणाम होण्याची शक्यता असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे स्थानिकांना रोजगाराची हमी, पर्यावरणाचे संरक्षण, जमीन व नैसर्गिक संसाधनांचे जतन, तसेच प्रभावित गावांच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस उपाययोजना करण्यात याव्यात, अशा विविध मागण्या ग्रामस्थांनी मांडल्या आहेत.
खुल्या बैठकीत सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्याची मागणी :-
कंपनीचे अधिकारी, प्रशासन आणि प्रभावित गावांतील नागरिक यांची संयुक्त खुली बैठक राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करून प्रकल्पाशी संबंधित सर्व मुद्द्यांवर पारदर्शक चर्चा करण्यात यावी. ग्रामस्थांच्या अटी-शर्तींचा विचार करून सर्वमान्य तोडगा काढण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी ग्रामस्थांच्या समस्या व व्यथा जाणून घेतल्या. “स्थानिक ग्रामस्थांच्या सोबत आपण ठामपणे आहोत. प्रभावित नागरिकांच्या न्याय्य मागण्या कंपनीच्या माध्यमातून पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू. तसेच या विषयाचा वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करू,” असे आश्वासन त्यांनी ग्रामस्थांना दिले.
राजे आत्राम यांच्या आश्वासनानंतर पीपली-बुर्गी परिसरातील प्रस्तावित प्रकल्पाबाबत ग्रामस्थांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. आता प्रशासन आणि कंपनीकडून ग्रामस्थांच्या मागण्यांबाबत कोणती भूमिका घेतली जाते, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
यावेळी पीपली येथील सचिन लेकामी, पुरुषोत्तम हेडो, दिलीप लेकामी, नानसू हिचामी, पेका लेकामी, मधुकर मट्टामी, संदीप लेकामी, भिवा पदा, रणजित लेकामी, प्रवीण लेकामी, बुर्गी येथील अजित नरोटे, विनोद पदा, अब्बू नरोटे, गणेश नरोटे, जिजावंडी येथील सत्तू तुमरेट्टी, सदाशिव तुमरेट्टी, मंगेश नरोटे, जवेली खुर्द येथील किशोर नरोटे, नागेश गोटा, नरेश दुर्वा, नितेश गोटा यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
