Saturday, September 5, 2026
HomeChamorshiई-पिक नोंदणीसाठी ‘महसूल’चा पुढाकार; डिजिटल क्रॉप सर्व्हेला प्रारंभ...

ई-पिक नोंदणीसाठी ‘महसूल’चा पुढाकार; डिजिटल क्रॉप सर्व्हेला प्रारंभ…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली /चामोर्शी,१९ ऑगस्ट २०२६::- खरीप हंगामातील पिकांची अचूक नोंदणी व्हावी आणि शासनाच्या विविध कृषी योजनांचा थेट लाभ शेतकऱ्यांना मिळावा, यासाठी महसूल प्रशासनाच्या वतीने चामोर्शी परिसरात ‘डिजिटल क्रॉप सर्व्हे’ (ई-पिक पाहणी) मोहिमेला प्रारंभ करण्यात आला आहे. या मोहिमेमुळे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पिकांची पाहणी करून ई-पिक नोंदणी करण्यात येत आहे.

चामोर्शी परिसरासाठी महसूल प्रशासनाकडून गुरुदेव बारसागडे, कार्तिक वासमकर आणि शंकर बोंडाळकर या तीन ई-पिक पाहणी सहाय्यकांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे सहाय्यक सध्या शेतकऱ्यांच्या शेतावर प्रत्यक्ष भेट देऊन पिकांची पाहणी करत आहेत.

खरीप हंगाम २०२६-२७ साठी केंद्र शासनाच्या ‘डिजिटल क्रॉप सर्व्हे’ ॲपद्वारे ११ ऑगस्ट ते १० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत ई-पिक नोंदणीची मोहीम राबविण्यात येत आहे. ज्या भागात मोबाईल नेटवर्क अथवा इंटरनेटची अडचण आहे, त्या ठिकाणी ऑफलाइन पद्धतीनेही ई-पिक पाहणीची नोंद करण्यात येत आहे.

ई-पिक नोंदणीचे शेतकऱ्यांना फायदे :-

ई-पिक पाहणीमुळे शेतात लागवड केलेल्या प्रत्यक्ष पिकाची अधिकृत नोंद शासनाच्या अभिलेखात होते. नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास पीक विमा व शासकीय मदत मिळण्यास सुलभता होते. तसेच कृषी विभागाच्या विविध अनुदानात्मक योजनांचा लाभ घेण्यासाठीही ई-पिक नोंदणी महत्त्वाची ठरते.

याशिवाय शासनाला अचूक पीक पाहणीची आकडेवारी उपलब्ध होत असल्याने कृषी धोरणे व नियोजन अधिक प्रभावीपणे करता येते. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शेतातील पिकांची ई-पिक पाहणी पूर्ण करून घेणे आवश्यक आहे.

१० नोव्हेंबरपूर्वी नोंदणी करण्याचे आवाहन :-

शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची ई-पिक पाहणी करून घेण्यासाठी संबंधित ई-पिक पाहणी सहाय्यकांशी संपर्क साधावा आणि १० नोव्हेंबर २०२६ पूर्वी आपल्या पिकांची नोंदणी निश्चित करावी, असे आवाहन ग्राम महसूल अधिकारी गोकुल वनकर चामोर्शीच्या वतीने करण्यात आले आहे.

तहसीलदार प्रशांत घोरड यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात येत असून, नियंत्रण अधिकारी म्हणून नायब तहसीलदार जी. व्ही. मोरे तसेच ग्राम महसूल अधिकारी गोवळ बनकर कामकाजावर लक्ष ठेवत आहेत.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular