VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
बंद पथदिवे व हायमास्ट लाईट तातडीने सुरू करा; नगरसेवक अमोल गुडेल्लीवार यांची मागणी,
गडचिरोली /अहेरी,१९ ऑगस्ट २०२६::- अहेरी शहरातील विविध प्रभाग, मुख्य रस्ते, चौक तसेच अंतर्गत रस्त्यांवरील अनेक पथदिवे आणि हायमास्ट लाईट मागील काही दिवसांपासून बंद असल्याने शहरातील अनेक भाग रात्रीच्या वेळी अंधारात बुडाले आहेत. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून, बंद पथदिवे तातडीने सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
या गंभीर समस्येकडे अहेरी नगरपंचायत प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी भाजपा नगरसेवक अमोल गुडेल्लीवार यांनी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी मिथुन नार्मलवार यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

शहरातील बंद असलेले सर्व पथदिवे तसेच हायमास्ट लाईट तातडीने दुरुस्त करून सुरू करावेत. तसेच नगरपंचायत प्रशासनाने सर्व प्रभागांची प्रत्यक्ष पाहणी करून बंद पथदिव्यांची माहिती संकलित करावी आणि आवश्यक ती तातडीची कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी केली.
सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून रात्रीच्या वेळी रस्त्यांवर अंधार असल्याने महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि कामानिमित्त रात्री ये-जा करणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अंधारामुळे अपघातांसह चोरी व इतर अनुचित प्रकारांची शक्यताही वाढू शकते.
दरम्यान, पथदिवे वारंवार बंद पडण्याची समस्या कायमस्वरूपी दूर करण्यासाठी नियमित देखभाल व तपासणीची व्यवस्था करण्यात यावी. नागरिकांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यासाठी प्रभावी तक्रार निवारण यंत्रणा उभारावी, अशीही मागणी नगरसेवक गुडेल्लीवार यांनी केली.
“नागरिकांची सुरक्षितता हीच आमची प्राथमिकता आहे. अहेरी शहरातील अंधाराचे साम्राज्य तातडीने दूर करून शहर प्रकाशमय झाले पाहिजे. बंद पथदिव्यांबाबत प्रशासनाने कोणतीही दिरंगाई न करता तातडीने कार्यवाही करावी,” अशी भूमिका नगरसेवक अमोल गुडेल्लीवार यांनी व्यक्त केली.
