VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
गडचिरोली ,२१ ऑगस्ट २०२६::- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे गडचिरोली जिल्हाप्रमुख पवन गेडाम यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवार, दि. २१ ऑगस्ट रोजी जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. वाढदिवसाचा अनाठायी जल्लोष न करता सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांच्या सेवेला प्राधान्य देण्यात आल्याने या उपक्रमांचे विशेष कौतुक होत आहे.
वाढदिवसानिमित्त सकाळी ११ वाजता वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत या माध्यमातून अधिकाधिक नागरिकांनी वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनाचा संकल्प करावा, असा उद्देश आहे.
यानंतर दुपारी १२ वाजता गडचिरोली येथील महिला रुग्णालयात ‘मायेचा घास’ हा उपक्रम राबविण्यात येणार असून, रुग्णांना मदतीचा हात देण्यात येणार आहे. तसेच दुपारी १ वाजता ग्रामीण रुग्णालय, वडसा येथे रुग्णांना फळवाटप करण्यात येणार आहे.
दुपारी ३ वाजता गोशाळेत गोसेवा उपक्रम राबवून गोमातेला चारा अर्पण करण्यात येणार आहे. त्यामुळे पर्यावरण संवर्धन, रुग्णसेवा आणि गोसेवा अशा विविध क्षेत्रांना स्पर्श करणारे सामाजिक उपक्रम वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आले आहेत.
दरम्यान, सायंकाळी ७ वाजता आरमोरी रोड, गडचिरोली येथील सांस्कृतिक हॉलमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, त्यानंतर सायंकाळी ७.३० वाजता स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या सर्व उपक्रमांमध्ये शिवसेना पदाधिकारी, महिला आघाडी, युवासेना पदाधिकारी तसेच सर्व शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजिक सेवेचा आदर्श निर्माण करण्याचा हा उपक्रम ठरणार आहे.
