VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
नगरसेवक अमोल गुडेल्लीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; ४२ कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न साकारण्याचा मार्ग मोकळा,
गडचिरोली /अहेरी,२१ ऑगस्ट २०२६::- अहेरी शहरातील इंदिरानगर बेघर कॉलनीतील नागरिकांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत दुसऱ्या डीपीआरमधील मंजूर यादी प्राप्त झाली असून, अहेरी शहरातील एकूण २७२ लाभार्थ्यांमध्ये बेघर कॉलनीतील तब्बल ४२ लाभार्थ्यांच्या घरकुलांना मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून हक्काच्या घराच्या प्रतीक्षेत असलेल्या ४२ कुटुंबांचे स्वप्न आता प्रत्यक्षात साकार होणार आहे.
या योजनेंतर्गत प्रत्येक पात्र लाभार्थ्याला २ लाख ५० हजार रुपयांचे अनुदान अहेरी नगरपंचायतीमार्फत मिळणार आहे. त्यामुळे बेघर कॉलनीतील नागरिकांना मोठा आर्थिक आधार मिळणार असून, त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागण्याची अपेक्षा आहे.
बेघर कॉलनीतील घरांची गेल्या अनेक वर्षांपासून दुरवस्था झाली होती. नागरिकांकडून हक्काच्या घरकुलासाठी सातत्याने मागणी केली जात होती. या प्रश्नाची दखल घेत भाजपा नगरसेवक अमोल गुडेल्लीवार यांनी घरकुल योजनेच्या मंजुरीसाठी सातत्याने पाठपुरावा केला.

माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे दीड वर्षापूर्वी बेघर कॉलनीमध्ये बैठक घेण्यात आली होती. तत्कालीन मुख्याधिकारी गणेश शहाणे यांच्या उपस्थितीत नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजनेबाबत माहिती देऊन पात्र लाभार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी मदत करण्यात आली होती.
त्यानंतर पात्र लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळावा यासाठी नगरसेवक अमोल गुडेल्लीवार यांनी संबंधित विभागाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला. अखेर दुसऱ्या डीपीआरच्या मंजूर यादीत बेघर कॉलनीतील ४२ घरकुलांना मंजुरी मिळाल्याने या प्रयत्नांना यश आले आहे.
हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाल्याने बेघर कॉलनीतील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक वर्षांची प्रतीक्षा संपून आता स्वतःच्या घराचा मजबूत निवारा मिळणार असल्याने लाभार्थी कुटुंबांनी समाधान व्यक्त केले आहे.
जनतेच्या मूलभूत प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा आणि विकासकामांना प्राधान्य देण्याचा निर्धार नगरसेवक अमोल गुडेल्लीवार यांनी व्यक्त केला आहे. या मंजुरीमुळे इंदिरानगर बेघर कॉलनीची ओळख बदलण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले आहे.
