VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
गडचिरोली /चामोर्शी,२१ ऑगस्ट २०२६::- गडचिरोली जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये प्रधानमंत्री आवास योजना व इतर घरकुल योजनेंतर्गत घरकुलांचे बांधकाम करणाऱ्या हजारो लाभार्थ्यांची देयके अद्याप प्रलंबित आहेत. त्यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या गोरगरीब लाभार्थ्यांच्या घरकुलांचे बांधकाम रखडले असून, अनेक कुटुंबांना अपूर्ण घरकुलांमध्ये राहण्याची वेळ आली आहे.
या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने पंचायत समिती चामोर्शीचे संवर्ग विकास अधिकारी पोळ यांना निवेदन देण्यात आले. जिल्ह्यातील घरकुल लाभार्थ्यांची प्रलंबित देयके तातडीने अदा करून रखडलेली बांधकामे पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने तत्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
यावेळी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय खुणे यांनी घरकुल योजना ही गोरगरीब नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची असून, देयके वेळेत मिळणे हा लाभार्थ्यांचा हक्क असल्याचे सांगितले. शासनाच्या योजनेचा लाभ मिळूनही निधीअभावी घरकुलाचे बांधकाम रखडणे ही गंभीर बाब असून, संबंधित विभागाने प्रलंबित देयकांचा तातडीने निपटारा करावा, अशी मागणी त्यांनी केली.
निवेदन देताना संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी, उपाध्यक्ष नानु भाऊ उपाध्ये, वनकर गुरुजी तसेच मंजेगाव येथील माजी सरपंच रमेश लेकलवार, गंगाधर रामटेके, रवी गर्तुलवार, अंकित मोहुर्ले, पलसपूर येथील पलास घरामी यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रलंबित देयके तातडीने वितरित करून लाभार्थ्यांना दिलासा द्यावा आणि घरकुलांचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
