Saturday, September 5, 2026
HomeGadchiroliगडचिरोली पोलिसांची दमदार कामगिरी; १०.९६ लाखांचा चोरीचा मुद्देमाल फिर्यादींच्या स्वाधीन ...

गडचिरोली पोलिसांची दमदार कामगिरी; १०.९६ लाखांचा चोरीचा मुद्देमाल फिर्यादींच्या स्वाधीन …

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

घरफोडी व जबरी चोरीच्या दोन गुन्ह्यांचा कौशल्यपूर्ण तपास; सहा आरोपींना अटक,

गडचिरोली ,२२ ऑगस्ट २०२६::- गडचिरोली पोलीस दलाने मालमत्तेविरुद्धच्या गंभीर गुन्ह्यांचा कौशल्यपूर्ण तपास करून घरफोडी व जबरी चोरीच्या दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांतील १० लाख ९६ हजार रुपये किमतीचा १०० टक्के चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हा मुद्देमाल पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांच्या हस्ते संबंधित फिर्यादींना परत करण्यात आला.

दि. २७ एप्रिल २०२६ रोजी रामनगर, गडचिरोली येथील महिला नातेवाईकांकडे एसटी बसने प्रवास करत असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या जवळील ५८.५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, किंमत ८ लाख ६२ हजार ५०० रुपये, चोरले होते. याप्रकरणी पोलीस स्टेशन गडचिरोली येथे गुन्हा क्र. ५१८/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपीचा शोध घेतला. आरोपीकडून चोरीस गेलेले संपूर्ण ५८.५ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले.

दरम्यान, दि. १६ मार्च २०२६ रोजी मौजा आमिर्झा येथील सोने-चांदीच्या दुकानाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी चोरी केली होती. या घटनेत २ लाख ३३ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे विविध दागिने चोरीस गेले होते. याप्रकरणी पोलीस स्टेशन गडचिरोली येथे गुन्हा क्र. २५४/२०२६, भा.न्या.सं. कलम ३०५(अ), ३३१(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

या गुन्ह्याचाही पोलिसांनी कसून तपास करत आरोपींचा शोध घेतला आणि त्यांच्याकडून चोरीस गेलेला २ लाख ३३ हजार ५०० रुपये किमतीचा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला.

या दोन्ही गुन्ह्यांच्या तपासादरम्यान पोलिसांनी एकूण सहा आरोपींना अटक केली. न्यायालयाकडून जप्त मुद्देमाल फिर्यादींना सुपूर्द करण्याचे आदेश प्राप्त झाल्यानंतर दि. २१ ऑगस्ट रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय, गडचिरोली येथे संबंधित फिर्यादींना बोलावून एकूण १० लाख ९६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल त्यांच्या स्वाधीन करण्यात आला.

चोरीस गेलेले सोन्या-चांदीचे दागिने पुन्हा आपल्या हाती मिळाल्याने फिर्यादींनी समाधान व्यक्त करत गडचिरोली पोलिसांच्या तत्पर व प्रभावी तपासाबद्दल आभार मानले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांच्या आदेशानुसार अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. गोकुल राज जी. व सहायक पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. अनिकेत हिरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन गडचिरोलीचे प्रभारी अधिकारी पोनि. विनोद चव्हाण यांच्या नेतृत्वात सपोनि. कृष्णा सोनुले, पोउपनि. अतुल तराळे व पोलीस अंमलदारांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

पोलिसांच्या तत्पर तपासामुळे नागरिकांचा विश्वास अधिक दृढ :-

गंभीर चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करून आरोपींना जेरबंद करत चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल परत मिळवून देण्यात गडचिरोली पोलिसांना मिळालेले हे यश नागरिकांच्या मालमत्तेच्या सुरक्षेसाठी पोलिसांची कार्यक्षमता आणि तत्परता अधोरेखित करणारे ठरले आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular