VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
येलचिल हद्दीत चार ठिकाणी छापे; ५.४० लाखांचा मोहफुल सडवा नष्ट,
गडचिरोली /अहेरी,२२ ऑगस्ट २०२६::- गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असतानाही सुरू असलेल्या अवैध दारू निर्मिती व विक्रीविरोधात गडचिरोली पोलिसांनी कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. येलचिल पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील नवेगाव व वेलगुर टोला परिसरात चार वेगवेगळ्या ठिकाणी धाड टाकून पोलिसांनी अवैध हातभट्टी दारू निर्मितीचा पर्दाफाश केला. या कारवाईत तब्बल ५,४०० लिटर मोहफुलाचा सडवा, अंदाजे ५ लाख ४० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल घटनास्थळीच नष्ट करण्यात आला.
पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी जिल्ह्यातील अवैध दारू विक्री, निर्मिती व साठवणुकीविरोधात प्रभावी कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार २० ऑगस्ट २०२६ रोजी येलचिल पोलीस पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे नवेगाव व वेलगुर टोला येथील शेतशिवारात छापेमारी करण्यात आली.

या कारवाईदरम्यान चार स्वतंत्र ठिकाणी अवैध हातभट्टी दारू निर्मिती सुरू असल्याचे आढळून आले. पोलिसांनी पंचांसमक्ष कारवाई करत ८ ड्रममधील ८०० लिटर, १० ड्रममधील १ हजार लिटर, १० ड्रममधील २ हजार लिटर आणि १६ ड्रममधील १ हजार ६०० लिटर, असा एकूण ४४ प्लास्टिक ड्रममधील ५,४०० लिटर मोहफुलाचा सडवा जप्त केला. त्याची एकूण अंदाजे किंमत ५ लाख ४० हजार रुपये आहे.
जप्त करण्यात आलेला मोहफुलाचा सडवा, हातभट्टी साहित्य तसेच तयार दारू नियमानुसार घटनास्थळीच नष्ट करण्यात आली. या प्रकरणी अहेरी पोलीस ठाण्यात अप. क्र. २७४/२०२६, २७५/२०२६, २७६/२०२६ व २७७/२०२६, महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (फ) अन्वये चार स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या प्रकरणात मारोती लक्ष्मण मोहुर्ले (३५), शंकर नागोराव सोनूले (३८), शंकर बिच्चु आत्राम (२४), सर्व रा. नवेगाव, ता. अहेरी, तसेच तिरुपती कनकय्या दुलम (४०), रा. वेलगुर, ता. अहेरी यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या आदेशानुसार अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी, अपर पोलीस अधीक्षक अहेरी हर्षवर्धन बी. जे. आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अहेरी हेमंत चांदेवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. येलचिल पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी पोउपनि. धनाजी शिंदे, पोउपनि. अशोक बांगर तसेच पोलीस अंमलदार गगुरी, गावडे, मंडलवार व शेंडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
गडचिरोली जिल्ह्यात अवैध दारू निर्मिती व विक्रीला आळा घालण्यासाठी पोलिसांकडून सुरू असलेल्या या धडक कारवाईमुळे अवैध दारू व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
