VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
विद्यार्थ्यांना आरोग्यदायी जीवनशैलीचे धडे,
गडचिरोली/चामोर्शी,२३ ऑगस्ट २०२६::- किशोरवय हा शारीरिक, मानसिक तसेच भावनिक बदलांचा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. या वयात योग्य मार्गदर्शन मिळाल्यास विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यदायी सवयी विकसित होऊन त्यांचे भविष्य अधिक निरोगी आणि सुरक्षित होण्यास मदत होते. याच उद्देशाने राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम (RKSK) अंतर्गत ग्रामीण रुग्णालय, चामोर्शी यांच्या वतीने यशोधरा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, चामोर्शी येथे किशोरवयीन आरोग्य मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रवीणकुमार किलनाके यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य श्याम रामटेके होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून ग्रामीण रुग्णालयाचे समुपदेशक पुरुषोत्तम घ्यार यांनी विद्यार्थ्यांना विविध आरोग्यविषयक बाबींची सविस्तर माहिती दिली.
यावेळी किशोरवयात होणारे शारीरिक, मानसिक व भावनिक बदल, संतुलित व पोषक आहाराचे महत्त्व, नियमित व्यायाम व प्राणायाम, स्वच्छता, व्यसनांपासून दूर राहण्याचे महत्त्व आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच प्रजनन व लैंगिक आरोग्य, विविध आजारांची लक्षणे, वैद्यकीय उपचार, एचआयव्ही/एड्सविषयी माहिती आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले.
मानसिक ताणतणावाची कारणे, त्यावर मात करण्याचे उपाय तसेच बदलत्या वयात निर्माण होणाऱ्या भावनिक समस्यांकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याचा सल्लाही विद्यार्थ्यांना देण्यात आला. लैंगिक हिंसाचारापासून संरक्षण, बालकांच्या सुरक्षेसाठी असलेला पोक्सो कायदा आणि विद्यार्थ्यांचे हक्क याबाबतही महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाला विज्ञान शिक्षक राजू धोंडे, सहाय्यक शिक्षिका घोंगे मॅडम, सुखबळे सर, सातपुते सर यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षक व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.
निरोगी शरीर, सक्षम मन आणि योग्य आरोग्यविषयक जाणीव हीच किशोरवयीन विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी भक्कम पायाभरणी ठरते, असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
