VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
जिल्ह्यातील सर्व नागरिक उपस्थित राहण्याचे आवाहन – माजी आमदार डॉ.देवरावजी होळी,
गडचिरोली,२५ ऑगस्ट २०२६::- निसर्गसंपन्नता, आदिवासी संस्कृती आणि विपुल नैसर्गिक साधनसंपत्ती लाभलेल्या गडचिरोली जिल्ह्याला आगामी काळात आत्मनिर्भर, समृद्ध आणि विकसित जिल्हा बनविण्याच्या उद्देशाने ‘आकांक्षित जिल्हा ते विकसित जिल्हा – व्हिजन २०४७’ ही संकल्पना मांडण्यात आली आहे. ‘समृद्ध गडचिरोली, सक्षम गडचिरोली, विकसित गडचिरोली’ हे या संकल्पनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
या व्हिजनमध्ये गडचिरोलीच्या नैसर्गिक, सामाजिक आणि आर्थिक क्षमतांचा योग्य वापर करून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यात आला आहे. नैसर्गिक संपत्तीचे संवर्धन, आदिवासी समाजाचा सर्वांगीण विकास, आधुनिक पायाभूत सुविधा, गुणवत्तापूर्ण शिक्षण व आरोग्य सेवा, स्थानिक रोजगार निर्मिती आणि उद्योगांना चालना देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
नैसर्गिक संपत्ती ही गडचिरोलीची ताकद :-
गडचिरोलीमध्ये समृद्ध वनसंपदा व जैवविविधता, लोहखनिजासह विविध खनिज संपत्ती, नद्या व जलसंपदा, तसेच कृषी व वनोपज क्षेत्रातील मोठी क्षमता आहे. धान, बांबू, तेंदूपत्ता, मध, लाख यांसारख्या कृषी व वनोपजांना बाजारपेठ उपलब्ध करून देत स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत करण्यावर भर देण्यात आला आहे.
यासोबतच आदिवासी संस्कृती, पारंपरिक ज्ञान, लोककला आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा जपत त्याला आधुनिक विकासाशी जोडण्याची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. धबधबे, जंगल, नद्या आणि वन्यजीवांच्या माध्यमातून पर्यावरणपूरक पर्यटनाला मोठी संधी असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
पायाभूत सुविधांचा विस्तार गरजेचा :-

व्हिजन २०४७मध्ये जिल्ह्यातील रस्ते, रेल्वे आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अपेक्षित विस्तार, दुर्गम व अतिदुर्गम भागातील आरोग्य व शिक्षण सुविधा मजबूत करणे, औद्योगिक विकास आणि रोजगाराच्या संधी वाढविणे, तसेच डिजिटल कनेक्टिव्हिटी आणि इंटरनेट सुविधा सर्व भागांपर्यंत पोहोचविण्यावर भर देण्यात आला आहे.
दुर्गम भागातील नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ वेळेत मिळावा, यासाठी प्रशासन आणि डिजिटल सेवा अधिक सक्षम करण्याची गरजही या आराखड्यात व्यक्त करण्यात आली आहे.
शेती, उद्योग आणि पर्यटनाला चालना :-
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती अधिक उत्पादनक्षम करण्यासोबतच सिंचनाचा विस्तार, कृषी प्रक्रिया उद्योग आणि कृषी आधारित उद्योगांना प्रोत्साहन देण्याची संधी गडचिरोलीसमोर आहे. बांबू, तेंदूपत्ता, लाख, मध आणि इतर वनोपजांचे मूल्यवर्धन करून स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती करण्यावर भर दिल्यास ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळू शकते.
‘इको-टुरिझम’ आणि आदिवासी सांस्कृतिक पर्यटनाला जागतिक दर्जाची ओळख मिळवून देण्याचीही मोठी क्षमता जिल्ह्यात आहे. त्यासाठी पर्यटनस्थळांवर मूलभूत सुविधा विकसित करण्याची आवश्यकता आहे.
आदिवासी विकास आणि रोजगाराला प्राधान्य :-
गडचिरोलीच्या विकासात आदिवासी समाजाचा सहभाग केंद्रस्थानी ठेवण्याची भूमिका या व्हिजनमध्ये मांडण्यात आली आहे. आदिवासी हक्क, संस्कृती आणि परंपरा जपत आधुनिक विकासाच्या संधी उपलब्ध करून देणे, युवकांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देणे, डिजिटल शिक्षण आणि स्टार्टअप्सला प्रोत्साहन देणे, तसेच स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी निर्माण करणे आवश्यक असल्याचे यात अधोरेखित करण्यात आले आहे.
