Sunday, September 6, 2026
HomeGadchiroliविकसित गडचिरोलीसाठी २०४७चा रोडमॅप; जिल्हा गौरव पुरस्काराने कर्तृत्ववानांचा सन्मान...

विकसित गडचिरोलीसाठी २०४७चा रोडमॅप; जिल्हा गौरव पुरस्काराने कर्तृत्ववानांचा सन्मान…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली,२६ ऑगस्ट २०२६::- गडचिरोली जिल्ह्याच्या ४४ व्या वर्धापन दिनानिमित्त ‘आकांक्षित जिल्हा ते विकसित गडचिरोली व्हिजन २०४७’ या संकल्पनेचा निर्धार करण्यात आला. इंदिरा गांधी चौकातील राजीव गांधी सभागृहात आयोजित विशेष कार्यक्रमात जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी विविध क्षेत्रांतील विकासदृष्टी, उद्दिष्टे आणि आगामी वाटचालीचा आराखडा मांडण्यात आला. यावेळी जिल्ह्याच्या विकासात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या प्रगतीशील शेतकरी, उद्योजक, नवउद्योजक, महिला उद्योजक, पत्रकार, समाजसेवक, सामाजिक संस्था व स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींचा ‘जिल्हा गौरव पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमात ‘विकसित गडचिरोली व्हिजन २०४७’चे मुख्य प्रवर्तक, भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी व्हिजनचे सादरीकरण केले. १६ व १७ ऑगस्ट रोजी झालेल्या दोन दिवसीय कार्यशाळेत विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी मांडलेल्या सूचना, संकल्पना आणि विकासाच्या दिशांचा आढावा यावेळी उपस्थितांसमोर मांडण्यात आला.

जिल्हा निर्मितीच्या योगदानकर्त्यांना अभिवादन :-

२६ ऑगस्ट १९८२ रोजी स्वतंत्र गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती झाली. स्वतंत्र जिल्ह्यासाठी तत्कालीन लोकप्रतिनिधी कै. बाबुराव मडावी, माजी खासदार मारोतराव कोवासे, माजी आमदार पेंटराम तलांडी यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी केलेल्या प्रयत्नांचे यावेळी स्मरण करण्यात आले. जिल्हा निर्मितीपासून आजवर विकासासाठी योगदान देणाऱ्या सर्व लोकप्रतिनिधी, अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांना अभिवादन करण्यात आले.

२०४७ पर्यंत विकसित जिल्ह्याचा संकल्प :-

गडचिरोलीला सन २०४७ पर्यंत विकसित, सक्षम आणि समृद्ध जिल्हा बनविण्यासाठी प्रत्येक क्षेत्राचा स्वतंत्र विकास आराखडा तयार करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात आला. शासन, प्रशासन आणि नागरिक यांच्यातील समन्वयातून विकासाला गती देण्याची गरज व्यक्त करण्यात आली.

जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, आयएएस-आयपीएस अधिकारी, विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी तसेच पोलीस प्रशासनापासून चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांपर्यंत प्रत्येकाने आपली कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडल्यास जिल्ह्याच्या विकासाला मोठी गती मिळू शकते, असे यावेळी नमूद करण्यात आले.

अहेरीला अधिक प्रशासकीय अधिकार देण्याची मागणी :-

अहेरी उपविभागातील नागरिकांना प्रशासन अधिक जवळून उपलब्ध व्हावे, यासाठी निर्माण करण्यात आलेल्या अपर जिल्हाधिकारी कार्यालयाला शासनाच्या आदेशानुसार आवश्यक प्रशासकीय व आर्थिक अधिकार पूर्णपणे मिळणे गरजेचे असल्याचे डॉ. होळी यांनी सांगितले. यासाठी ‘विकसित गडचिरोली व्हिजन २०४७’च्या माध्यमातून शासनाकडे पाठपुरावा करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

शिक्षण क्षेत्रासाठी स्वतंत्र विकास आराखडा :-

‘शैक्षणिक विकास आराखडा – गडचिरोली २०४७’ तयार करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे टप्प्याटप्प्याने डिजिटल शाळांमध्ये रूपांतर, निवडक शासकीय शाळांचा आधुनिक पद्धतीने विकास तसेच शासकीय व अनुदानित आश्रमशाळांचे डिजिटल व मॉडेल स्कूलमध्ये रूपांतर करण्यावर भर देण्यात आला. आधुनिक प्रयोगशाळा, ग्रंथालये, तंत्रज्ञान आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज व्यक्त करण्यात आली.

वैद्यकीय महाविद्यालयाला ‘गोंडवाना’ नाव देण्याचा मानस :-

गडचिरोलीतील नागरिकांना आधुनिक आरोग्य सुविधा स्थानिक पातळीवर मिळाव्यात, यासाठी स्वतंत्र आरोग्य विकास आराखडा तयार करण्याची गरज असल्याचे डॉ. होळी यांनी सांगितले. गडचिरोली येथे उभारण्यात येणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला ‘गोंडवाना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय’ असे नामकरण करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामाची प्रक्रिया गतीने पूर्ण करून प्रत्यक्ष बांधकामास सुरुवात व्हावी, यासाठी गडचिरोलीकरांच्या माध्यमातून शासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तोपर्यंत जिल्ह्यातील शासकीय आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात येणार आहे.

शेती, उद्योग, रोजगार आणि पर्यटनालाही प्राधान्य :-

शिक्षण, आरोग्य, प्रशासन, रोजगार, शेती, सिंचन, उद्योग, पायाभूत सुविधा आणि पर्यटन या सर्व क्षेत्रांचा समन्वय साधून गडचिरोलीचा शाश्वत विकास साधण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, उद्योजक, शेतकरी, युवक, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांनी एकत्रितपणे काम केल्यास जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

कार्यक्रमाचे संचालन लोककलावंत विजय शेंडे व आदिवासी विकास परिषदेचे जिल्हा महासचिव उमेश उईके यांनी केले.

‘४४ वर्षांचा प्रवास पूर्ण; आता २०४७च्या विकसित गडचिरोलीसाठी नव्या संकल्पाची सुरुवात’ या संदेशाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular