Sunday, September 6, 2026
HomeGadchiroli‘विकसित गडचिरोली व्हिजन २०४७’ला वैचारिक अधिष्ठान द्या; शासकीय कार्यालयांत प्रेरणास्थळे उभारा...

‘विकसित गडचिरोली व्हिजन २०४७’ला वैचारिक अधिष्ठान द्या; शासकीय कार्यालयांत प्रेरणास्थळे उभारा…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

माजी आमदार डॉ. देवराव होळी यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन,

गडचिरोली ,२७ ऑगस्ट २०२६::- गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वांगीण, शाश्वत आणि सर्वसमावेशक विकासासाठी मांडण्यात आलेल्या ‘विकसित गडचिरोली व्हिजन २०४७’ या संकल्पनेला सामाजिक व वैचारिक अधिष्ठान मिळावे, यासाठी प्रमुख शासकीय कार्यालयांच्या परिसरात महामानवांची पूर्णाकृती स्मारके व प्रेरणास्थळे उभारण्यात यावीत, अशी मागणी भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस मुख्यालय आणि जिल्हा परिषद परिसरातील उपलब्ध खुल्या जागेत छत्रपती शिवाजी महाराज, वीर बाबुराव शेडमाके, धरतीआबा बिरसा मुंडा, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांसारख्या महामानवांची स्मारके उभारण्याची सूचना त्यांनी केली आहे.

महामानवांचे कार्य, त्यांचे विचार आणि सामाजिक योगदान आजच्या युवा पिढीसाठी दिशादर्शक आहे. त्यामुळे शासकीय कार्यालयांत येणारे विद्यार्थी, युवक आणि नागरिक यांना त्यांच्या कार्याची सतत प्रेरणा मिळावी, या उद्देशाने ही प्रेरणास्थळे विकसित करणे आवश्यक असल्याचे डॉ. होळी यांनी म्हटले आहे.

पुतळ्यांसोबत डिजिटल माहिती केंद्राचीही मागणी :-

केवळ पुतळे उभारण्यापुरता हा उपक्रम मर्यादित न ठेवता प्रत्येक प्रेरणास्थळाजवळ संबंधित महामानवांच्या जीवनकार्याची, सामाजिक योगदानाची आणि विचारांची माहिती देणारे माहिती फलक, डिजिटल माहिती केंद्र किंवा छोटेखानी प्रेरणादालन उभारण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

यामुळे युवकांमध्ये राष्ट्रप्रेम, सामाजिक समता, शिक्षण, सामाजिक न्याय आणि समाजसेवेची भावना रुजण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

‘विकसित गडचिरोली व्हिजन २०४७’ म्हणजे केवळ रस्ते, इमारती आणि औद्योगिक विकास नव्हे, तर इतिहासाची जाणीव असलेली, संस्कारित, जागरूक आणि सक्षम युवा पिढी घडविण्याचा संकल्प आहे, असे डॉ. देवराव होळी यांनी स्पष्ट केले.

या प्रस्तावावर सकारात्मक निर्णय घेऊन संबंधित विभागांची बैठक बोलवावी, उपलब्ध जागांची पाहणी करावी, आवश्यक आराखडा तयार करून प्रशासकीय मान्यता व निधीची तरतूद करावी आणि ‘विकसित गडचिरोली व्हिजन २०४७’ अंतर्गत हा उपक्रम प्रत्यक्षात आणण्यासाठी कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular