VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
जिल्ह्याच्या ४४ व्या स्थापना दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गडचिरोलीवासीयांना शुभेच्छा संदेश,
गडचिरोली ,२७ ऑगस्ट २०२६::- गडचिरोली जिल्ह्याच्या निर्मितीला ४४ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्यातील नागरिकांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. माओवादाची जुनी ओळख मागे टाकत गडचिरोली आज विकासाच्या नव्या पर्वात प्रवेश करत असून, देशाचे ‘ग्रीन स्टील हब’ म्हणून जिल्हा उदयास येत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात नमूद केले.
गडचिरोली जिल्ह्याला आपल्या हृदयात विशेष स्थान असल्याचे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. माओवादमुक्त गडचिरोली ही निश्चितच अभिमानाची बाब असून, आता जिल्ह्याची ओळख उद्योग, रोजगार आणि विकासाच्या माध्यमातून निर्माण होत असल्याचे त्यांनी म्हटले.
उद्योग, रोजगार आणि पायाभूत सुविधांना चालना :-
मुख्यमंत्री म्हणाले की, २०१४ पासून गडचिरोलीच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात आले. या प्रयत्नांचे सकारात्मक परिणाम आता दिसून येत असून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत आहे. उद्योगांसोबतच शिक्षण, रोजगार आणि पायाभूत सुविधांच्या विकासाला शासनाने प्राधान्य दिले आहे. यामुळे गडचिरोलीसह लगतच्या भागातील युवकांसाठीही रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत.
विकासासोबत पर्यावरण संवर्धनावरही भर :-
औद्योगिक विकासाला गती देतानाच जल, जमीन, जंगल आणि पर्यावरणाचे संवर्धन यालाही समान महत्त्व दिले जात असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. विकास आणि पर्यावरण यांचा समतोल राखत गडचिरोलीच्या नैसर्गिक संपदेचे जतन करण्यावर शासनाचा भर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मेडिकल कॉलेज, विमानतळ, रेल्वे आणि रस्त्यांमुळे विकासाला गती :-
मेडिकल कॉलेज, विमानतळ, रेल्वेमार्ग, रस्ते तसेच शैक्षणिक सुविधांच्या विस्तारामुळे गडचिरोलीच्या विकासाला नवी दिशा मिळत आहे. पायाभूत सुविधांचे जाळे मजबूत होत असल्याने जिल्ह्याच्या औद्योगिक आणि आर्थिक प्रगतीला आणखी वेग मिळणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
नागरिकांच्या सहभागामुळे परिवर्तन शक्य :-
गडचिरोलीच्या बदलत्या चित्राचे श्रेय जिल्ह्यातील नागरिकांनाही देत मुख्यमंत्री फडणवीस यांनी विकासाच्या प्रक्रियेत नागरिकांनी दिलेली साथ महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले. शासनाच्या प्रयत्नांना नागरिकांचा सहभाग मिळाल्यामुळे जिल्ह्याची विकासयात्रा अधिक गतिमान होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“चला, आपण सर्वजण मिळून विकसित गडचिरोलीच्या संकल्पाला आणखी बळ देऊया,” असे आवाहन करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्याच्या ४४ व्या स्थापना दिनानिमित्त गडचिरोली जिल्ह्यातील सर्व नागरिकांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
