VAINGANGA NEWS 24 विशेष प्रतिनिधी,
नवजीवन वसाहतीत ७० आत्मसमर्पित महिलांचा उत्स्फूर्त सहभाग; पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बांधल्या राख्या
गडचिरोली, २८ ऑगस्ट २०२६ : हिंसाचाराचा मार्ग सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात परतलेल्या आत्मसमर्पित महिला माओवादी सदस्यांच्या मनात विश्वास, आपुलकी आणि सुरक्षिततेची भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने गडचिरोली पोलीस दलाच्या ‘प्रोजेक्ट संजीवनी’ अंतर्गत नवजीवन वसाहत, नवेगाव येथे रक्षाबंधनाचा अनोखा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात तब्बल ७० आत्मसमर्पित महिला माओवादी सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी नवजीवन वसाहतीला भेट देत आत्मसमर्पित महिलांसोबत रक्षाबंधन साजरे केले. यावेळी महिलांनी पोलीस अधिकारी तसेच सी-६० जवानांना राखी बांधून बंधुभावाचे नाते दृढ केले. महिला पोलीस अधिकाऱ्यांनीही आत्मसमर्पित महिलांना राखी बांधत त्यांच्यासोबत हा सण आनंदाने साजरा केला.
यावेळी पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी आत्मसमर्पित महिला सदस्यांना भेटवस्तू देऊन त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधला. त्यांच्या अडचणी, समस्या आणि पुनर्वसन प्रक्रियेबाबत माहिती जाणून घेतली. आत्मसमर्पित माओवादी सदस्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सन्मानाने आणि सुरक्षितपणे जीवन जगता यावे, यासाठी गडचिरोली पोलीस दलाकडून आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.

गडचिरोली जिल्ह्यात माओवादविरोधी अभियानासोबतच आत्मसमर्पित माओवादी सदस्यांच्या पुनर्वसनावरही पोलीस दलाकडून विशेष भर दिला जात आहे. शासनाच्या आत्मसमर्पण योजना-२००५ अंतर्गत आजपर्यंत एकूण ८१९ माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे. या सदस्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत.

दरम्यान, पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्यासह अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक अहेरी हर्षवर्धन बी. जे. आणि सहायक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे यांनी पोलीस स्टेशन गडचिरोली, चातगाव तसेच पोलीस मदत केंद्र गोडलवाही येथे भेट देऊन महिला पोलीस अधिकारी, अंमलदार आणि शालेय विद्यार्थिनींसोबतही रक्षाबंधन साजरे केले.

अतिसंवेदनशील गडचिरोली जिल्ह्यात कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदारांचे मनोबल वाढविण्यासाठी श्रीमती नाथीबाई दामोधर ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई, भरारी प्रतिष्ठान, पुणे तसेच मुंबई शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थिनींनी राख्या पाठविल्या. या उपक्रमातून विद्यार्थिनींनी गडचिरोलीतील पोलीस बांधवांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देत त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

या कार्यक्रमाला पोलीस उपअधीक्षक (अभियान) सुनील उईके, प्रभारी पोलीस उपअधीक्षक (गृह) संजय सिंह, पोनि. सिटीसी किटीळी समाधान चव्हाण, पोनि. स्थागुशा अरुण फेगडे, पोनि. मो.प.वि. विवेक पांडव यांच्यासह पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.
हिंसेच्या वाटेवरून मुख्य प्रवाहातील सन्मानाच्या जीवनाकडे वाटचाल करणाऱ्या आत्मसमर्पित महिलांसोबत साजरे झालेले हे रक्षाबंधन विश्वास, माणुसकी आणि नव्या आयुष्याचा संदेश देणारे ठरले.
