Saturday, September 5, 2026
HomeChamorshiई-पिक पाहणीविरोधात महसूल सेवक आक्रमक...

ई-पिक पाहणीविरोधात महसूल सेवक आक्रमक…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

वन्यप्राण्यांचा धोका, साधनसुविधांचा अभाव; चामोर्शी तहसीलदारांना निवेदन देत कामातून वगळण्याची मागणी,

गडचिरोली /चामोर्शी,२८ ऑगस्ट २०२६::- शेतकऱ्यांच्या पिकांची डिजिटल नोंद करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘ई-पिक पाहणी’च्या कामाला चामोर्शी तालुका महसूल सेवक संघटनेने विरोध दर्शविला आहे. महसूल सेवकांना या कामातून वगळण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दि. २७ ऑगस्ट रोजी चामोर्शी तहसीलदारांकडे निवेदन सादर केले.

चामोर्शी तालुक्यातील अनेक गावांमधील शेतजमिनी घनदाट जंगल परिसरात आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष शेतावर जाऊन ई-पिक पाहणी करताना साप, विंचू तसेच वन्यप्राण्यांचा सामना होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत महसूल सेवकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो, असा मुद्दा संघटनेने निवेदनातून उपस्थित केला आहे.

अपघात झाल्यास जबाबदारी कोणाची:-? 

ई-पिक पाहणीदरम्यान वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात कर्मचारी जखमी अथवा मृत झाल्यास त्याची जबाबदारी कोणाची, असा सवाल संघटनेने केला आहे. अशा दुर्घटनेत कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळावा यासाठी किमान ५० लाख रुपयांची विमा पॉलिसी देण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

स्मार्टफोन व तांत्रिक सुविधांचा अभाव :-

महसूल सेवक हे मानधनी कर्मचारी असून ई-पिक पाहणीसाठी आवश्यक स्मार्टफोन, इंटरनेट भत्ता तसेच पुरेसे तांत्रिक प्रशिक्षण शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आलेले नाही, असा आक्षेप संघटनेने घेतला आहे. अॅपचा वापर, इंटरनेटचा खर्च आणि अन्य तांत्रिक बाबींचा आर्थिक भार कर्मचाऱ्यांवर पडत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

पीक नोंदीतील चुकांची जबाबदारी नको :-

ई-पिक पाहणीतील नोंदीच्या आधारे शेतकऱ्यांना पीककर्ज, पीकविमा तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ मिळत असतो. त्यामुळे नोंद करताना काही त्रुटी राहिल्यास त्याची कायदेशीर जबाबदारी महसूल सेवकांवर येण्याची शक्यता आहे. महसूल सेवकांना ई-पिक पाहणीचे तांत्रिक प्रशिक्षण अथवा त्यासंदर्भातील कायदेशीर अधिकार नसताना त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवू नये, अशी मागणी संघटनेने केली आहे.

‘माझी शेती, माझा पीक पेरा’नुसार जबाबदारी शेतकऱ्यांचीच :-

‘माझी शेती, माझा पीक पेरा’ या संकल्पनेनुसार पीक पेरा भरण्याची प्राथमिक जबाबदारी शेतकऱ्यांचीच आहे. त्यामुळे चामोर्शी तालुक्यातील महसूल सेवकांना ई-पिक पाहणीचे काम सक्तीने देण्यात येऊ नये, अशी मागणी संघटनेने केली आहे.

या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार न झाल्यास नियमबाह्य कामाला विरोध करण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशाराही महसूल सेवक संघटनेने दिला आहे.

महसूल सेवकांच्या या भूमिकेमुळे चामोर्शी तालुक्यातील ई-पिक पाहणीच्या अंमलबजावणीसमोर प्रशासनापुढे नवे आव्हान निर्माण झाले असून, तहसील प्रशासन या मागणीवर काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular