Saturday, September 5, 2026
HomeChamorshiगौरीपूरमध्ये फुटबॉलचा थरार; ४७ वर्षांची परंपरा दिमाखात सुरू...

गौरीपूरमध्ये फुटबॉलचा थरार; ४७ वर्षांची परंपरा दिमाखात सुरू…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांच्या हस्ते ‘फुटबॉल स्पर्धा २०२६’चा शानदार शुभारंभ,

आमदार डॉ. मिलिंद नरोटे व माजी आमदार डॉ. देवराव होळी यांची प्रमुख उपस्थिती,

गडचिरोली/चामोर्शी,(गौरीपूर),२८ ऑगस्ट २०२६::- गौरीपूर येथील जय दुर्गा स्पोर्ट अँड कल्चरल असोसिएशनच्या वतीने गेल्या ४७ वर्षांपासून अखंडपणे सुरू असलेल्या फुटबॉल क्रीडा परंपरेचा वारसा यंदाही उत्साहात पुढे नेण्यात आला. ‘फुटबॉल स्पर्धा २०२६’चा भव्य शुभारंभ शुक्रवार, दि. २८ ऑगस्ट रोजी जय दुर्गा स्टेडियम, चामोर्शी-घोट रोड, बसस्टँड, गौरीपूर येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

स्पर्धेचे उद्घाटन माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे तसेच भाजपा आदिवासी मोर्चा प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवरावजी होळी यांची प्रमुख उपस्थिती होती. या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे उद्घाटन सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

उद्घाटनप्रसंगी डॉ. अशोकजी नेते यांनी स्वतः फुटबॉलला किक मारून गोल करत स्पर्धेचा शुभारंभ केला. त्यांच्या या कृतीला उपस्थित खेळाडू, आयोजक आणि क्रीडाप्रेमींनी उत्स्फूर्त दाद दिली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी खेळाडूंशी संवाद साधून त्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

४७ वर्षांची क्रीडा परंपरा अभिमानाची – डॉ. अशोकजी नेते :-

उपस्थितांना मार्गदर्शन करताना डॉ. अशोकजी नेते म्हणाले की, गौरीपूर येथे दरवर्षी आयोजित होणाऱ्या फुटबॉल स्पर्धेला आपली सातत्याने उपस्थिती राहिली आहे. गेल्या ४७ वर्षांपासून ही क्रीडा परंपरा अखंडपणे सुरू राहणे ही निश्चितच अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे.

खेळामुळे शरीर तंदुरुस्त राहते, आत्मविश्वास वाढतो आणि संघभावना विकसित होते. विद्यार्थ्यांनी व युवकांनी शिक्षणासोबतच खेळालाही महत्त्व दिले पाहिजे. क्रीडाक्षेत्रातून शिस्त, नेतृत्वगुण, परस्पर सहकार्य आणि राष्ट्रभावना निर्माण होते. ग्रामीण भागातील खेळाडूंना आपले कौशल्य दाखविण्यासाठी अशा स्पर्धा मोठे व्यासपीठ उपलब्ध करून देतात, असे त्यांनी सांगितले.

युवकांनी खेळाकडे केवळ मनोरंजन म्हणून न पाहता क्रीडेतून आपल्या व्यक्तिमत्त्वाचा आणि भवितव्याचा विकास साधावा. ग्रामीण भागातील प्रतिभावान खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी अशा स्पर्धांचे सातत्याने आयोजन होणे आवश्यक असल्याचेही डॉ. नेते यांनी स्पष्ट केले.

आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांची खेळाडूंना प्रोत्साहनाची भूमिका :-

यावेळी आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे यांनी जय दुर्गा स्पोर्ट अँड कल्चरल असोसिएशनच्या ४७ वर्षांच्या अखंड क्रीडा परंपरेचे कौतुक केले. ग्रामीण भागात अनेक दशकांपासून फुटबॉलसारख्या खेळाला प्रोत्साहन देत युवकांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे ही उल्लेखनीय बाब असल्याचे त्यांनी सांगितले.

खेळामुळे युवकांमध्ये शिस्त, आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि संघभावना विकसित होते. ग्रामीण भागातील अनेक खेळाडूंमध्ये उत्तम गुणवत्ता आहे; मात्र त्यांना योग्य संधी आणि व्यासपीठ मिळणे आवश्यक आहे. अशा स्पर्धांमुळे ही संधी उपलब्ध होत असल्याचे सांगत त्यांनी सर्व सहभागी संघ व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

विशेष म्हणजे, स्पर्धेतील द्वितीय क्रमांकासाठी ३५ हजार १ रुपयांचे पारितोषिक आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे यांच्या कडून देण्यात येणार आहे. त्यामुळे स्थानिक खेळाडूंना प्रोत्साहन देण्याची त्यांची भूमिका अधोरेखित झाली.

माजी आमदार डॉ. देवराव होळी यांचीही उपस्थिती :-

उद्घाटन सोहळ्यास भाजपा आदिवासी मोर्चा प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवरावजी होळी यांची उपस्थिती विशेष ठरली. त्यांनीही ४७ वर्षांची फुटबॉल परंपरा जपणाऱ्या जय दुर्गा स्पोर्ट अँड कल्चरल असोसिएशनचे अभिनंदन केले.

ग्रामीण भागातील युवकांना क्रीडा क्षेत्रात पुढे जाण्यासाठी अशा स्पर्धा प्रेरणादायी ठरतात. खेळाडूंनी जिद्द, शिस्त आणि सातत्याच्या जोरावर आपली गुणवत्ता सिद्ध करावी, तसेच क्रीडाक्षेत्रात उज्ज्वल भविष्य घडवावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

विजेत्यांसाठी आकर्षक पारितोषिके :-

स्पर्धेतील प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या संघासाठी माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांच्या कडून ५५ हजार १ रुपये, द्वितीय क्रमांकासाठी आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे यांच्या कडून ३५ हजार १ रुपये, तर तृतीय क्रमांकासाठी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणयजी खुणे यांच्या कडून १५ हजार १ रुपये अशी आकर्षक पारितोषिके ठेवण्यात आली आहेत.

याशिवाय विविध वैयक्तिक व सांघिक उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंनाही विशेष पुरस्कार देण्यात येणार आहेत. त्यामुळे सहभागी संघांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली असून, आगामी सामन्यांमध्ये चुरशीच्या लढती पाहायला मिळणार आहेत.

मान्यवरांची मोठी उपस्थिती :-

उद्घाटन कार्यक्रमास माजी खासदार डॉ. अशोकजी नेते, आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे, भाजपा आदिवासी मोर्चा प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवरावजी होळी, भाजपा किसान मोर्चा प्रदेश सचिव रमेशजी भुरसे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणयजी खुणे, भाजपा तालुका अध्यक्ष रोशनी वरघंटे, भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष भास्करजी बुरे, भाजपा बंगाली मोर्चा जिल्हाध्यक्ष सुरेशजी शहा, भाजपा जिल्हा सचिव दिलीपजी चलाख, भाजपा महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष अनिताताई रॉय, युवा नेते भाविकजी आभारे, माजी पंचायत समिती सदस्य तथा तालुका महामंत्री विष्णुजी ढाली, ज्येष्ठ नेते मनोहरजी बामणकर, माजी सरपंच अशीमजी मुखर्जी, उपसरपंच महानंदजी हलदार, तरुणजी गाईन, रितेश पालरपवार, पलाशजी रॉय, कर्णधारजी बाकची, सुजितजी मंडल, अंकुशजी बराई, देवाशीषजी मंडल, किशोरजी मुखर्जी, विकासजी सरकार, सुमितजी सरकार यांच्यासह भाजपा पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, आयोजक, ग्रामस्थ आणि मोठ्या संख्येने खेळाडू उपस्थित होते.

गौरीपूर परिसरात क्रीडामय वातावरण :-

जय दुर्गा स्पोर्ट अँड कल्चरल असोसिएशनने जपलेली ४७ वर्षांची क्रीडा परंपरा आजही ग्रामीण भागातील युवकांना प्रेरणा देत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून स्थानिक आणि परिसरातील खेळाडूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याचे व्यासपीठ मिळत असून, युवकांमध्ये क्रीडाप्रेम वाढण्यास मोठी मदत होत आहे.

उद्घाटन सोहळ्यावेळी मैदानावर खेळाडूंचा उत्साह आणि क्रीडाप्रेमींचा जल्लोष पाहायला मिळाला. मान्यवरांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

कार्यक्रमाच्या समारोपावेळी राष्ट्रगीताने वातावरण भारावून गेले. राष्ट्रगीताच्या माध्यमातून उपस्थित खेळाडू व युवकांच्या मनात राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रभावना जागृत करण्याचा संदेश देत उद्घाटन सोहळ्याची सांगता करण्यात आली.

४७ वर्षांची परंपरा जपत ग्रामीण भागातील क्रीडा प्रतिभेला व्यासपीठ देणाऱ्या जय दुर्गा स्पोर्ट अँड कल्चरल असोसिएशनच्या या उपक्रमाचे मान्यवरांसह ग्रामस्थ आणि क्रीडाप्रेमींनी विशेष कौतुक केले.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular