Saturday, September 5, 2026
HomeChamorshiविद्यार्थ्यांच्या बस समस्येची आमदार नरोटेंनी घेतली गंभीर दखल; एसटी अधिकाऱ्यांसोबत तातडीने चर्चा...

विद्यार्थ्यांच्या बस समस्येची आमदार नरोटेंनी घेतली गंभीर दखल; एसटी अधिकाऱ्यांसोबत तातडीने चर्चा…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली/ चामोर्शी, 02 सप्टेंबर 2026::- चामोर्शी तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या बससेवेबाबत निर्माण झालेल्या विविध समस्यांची आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या चामोर्शी जनसंपर्क कार्यालयाने गंभीर दखल घेतली आहे. विद्यार्थ्यांनी मंगळवारी चामोर्शी बसस्थानकावर केलेल्या चक्काजाम आंदोलनानंतर ही कार्यवाही करण्यात आली.

चामोर्शी तालुक्यातील विविध ग्रामीण भागातून शेकडो विद्यार्थी व विद्यार्थिनी शिक्षणासाठी चामोर्शी येथे येतात. मात्र बससेवा अनियमित असणे, नियोजित वेळेवर बस उपलब्ध न होणे, काही फेऱ्या रद्द होणे तसेच विद्यार्थ्यांना प्रवासासाठी अडचणी निर्माण होणे, अशा विविध तक्रारी विद्यार्थ्यांनी आंदोलनादरम्यान मांडल्या होत्या. पोलिस विभाग व संबंधित अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर विद्यार्थ्यांनी चक्काजाम आंदोलन स्थगित केले होते.

या घटनेची आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी तातडीने दखल घेत चामोर्शी जनसंपर्क कार्यालयात विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डॉ. प्रणय भाऊ खुणे यांना पाठविले. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या बससेवेशी संबंधित विविध समस्या व मागण्या त्यांच्यासमोर मांडल्या.

यानंतर डॉ. प्रणय खुणे यांनी एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक तसेच गडचिरोली आगार व्यवस्थापक यांच्याशी दूरध्वनीवरून थेट चर्चा करून विद्यार्थ्यांच्या समस्यांची माहिती दिली. तसेच चामोर्शी तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या बससेवेसंदर्भात तातडीने बैठक घेऊन समस्या सोडविण्याची मागणी केली.

“चामोर्शी तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या बससेवेबाबतच्या सर्व तक्रारींचे एसटी महामंडळाने तात्काळ निरसन करावे. विद्यार्थ्यांना वेळेवर व नियमित बससेवा मिळणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्या वरिष्ठ पातळीवर पोहोचवून त्यावर तातडीने कार्यवाही करण्यासाठी पाठपुरावा केला जाईल,” अशी भूमिका डॉ. प्रणय भाऊ खुणे यांनी व्यक्त केली.

यावेळी एसटी महामंडळाकडून प्राप्त झालेले बस शेड्युल तसेच विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांवरही चर्चा करण्यात आली. विद्यार्थ्यांकडून निवेदन स्वीकारून संबंधित विभाग नियंत्रक व आगार व्यवस्थापकांकडून समस्या सोडविण्याबाबत तातडीच्या कार्यवाहीचे आश्वासन घेण्यात आले.

या प्रसंगी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी, मानवाधिकार संघटनेचे नेते भीमराव वनकर, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद आसुटकर, कार्यालय प्रमुख विनोद किरमे, मनीषा बोधनवार, किशोर कुंडू, पलाश घरामी, तारक हलदार यांच्यासह चामोर्शी शहरातील शिक्षक, शिक्षिका व मुख्याध्यापक उपस्थित होते.

विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर प्रशासन व एसटी महामंडळाने आता त्यांच्या मागण्यांवर प्रत्यक्ष कार्यवाही करावी, अशी अपेक्षा विद्यार्थी व पालकांकडून व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular