VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
GADC/अहेरी, 02 सप्टेंबर 2026::- अहेरी तालुक्यातील गोलाकर्जी-रायगट्टा-राजाराम-छल्लेवाडा-कोळसेलगुडम-कमलापूर-रेपनपल्ली या मुख्य रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे.या रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले असून याबाबत वेळोवेळी सूचना व पत्रव्यवहार करून देखील जिल्हा परिषद प्रशासन व संबंधित विभाग दुर्लक्ष करीत आहे.
सध्या पावसाळा सुरू असल्याने रस्त्याची चाळण झाली असून नागरिकांना ये-जा करण्यास मोठी अडचण निर्माण होत आहे. या खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून शाळकरी विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन शाळेत जावे लागत आहे.
या गंभीर विषयावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.अजय कंकडालवार यांनी मुख्य कार्यपालन अधिकारी,जिल्हा परिषद गडचिरोली यांना निवेदन देऊन रस्त्याचे तात्काळ बांधकाम व दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.
तात्पुरती डागडुजीसोबतच नवीन रस्ता मंजूर करण्याचीही मागणी:-
सध्या पावसाळ्यामुळे नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेता तात्पुरत्या स्वरूपात रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात यावेत आणि या संपूर्ण रस्त्यासाठी नवीन रस्ता मंजूर करण्यात यावा,अशीही मागणी अजयभाऊ कंकडालवार यांनी केली आहे.
प्रशासनाला ७ दिवसांचा अल्टिमेटम देत त्यांनी इशारा दिला आहे की,जर ७ दिवसाच्या आत रस्त्यावरील खड्डे बुजविले नाहीत,तर दिनांक ०८ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता छल्लेवाडा-कमलापूर रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये धान रोवणी व रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल.
दरम्यान,या निवेदनाची दखल घेऊन प्रशासन खड्डे बुजवणार का, की नेहमीप्रमाणे आंदोलनानंतरच प्रशासनाला जाग येणार, असा सवाल सामान्य नागरिकांमधून उपस्थित होत आहे.
