VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
विज्ञान प्रदर्शनाचे उत्साहात उद्घाटन; नाविन्यपूर्ण प्रकल्पांची पाहणी करून विद्यार्थ्यांचे कौतुक, प्रयोगशीलतेचा दिला मंत्र.
चामोर्शी, दि. २ सप्टेंबर : चामोर्शी येथील एकलव्य आदिवासी निवासी शाळेत विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक कल्पकतेला आणि सर्जनशीलतेला चालना देण्यासाठी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनाचे उद्घाटन चामोर्शी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे यांच्या हस्ते उत्साहात करण्यात आले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध नाविन्यपूर्ण वैज्ञानिक प्रकल्पांची पाहणी करून त्यांच्या कल्पकतेचे कौतुक केले.
विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी विज्ञान, तंत्रज्ञान, पर्यावरण, दैनंदिन जीवनातील समस्या तसेच विविध उपयुक्त संकल्पनांवर आधारित आकर्षक प्रकल्प सादर केले. प्रत्येक प्रकल्पाची पाहणी करताना पोलीस निरीक्षक ढाकणे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. प्रकल्पाची संकल्पना, त्यामागील वैज्ञानिक तत्त्व, कार्यपद्धती आणि समाजासाठी होणारा उपयोग याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांकडून माहिती जाणून घेतली.
‘प्रयोगातून शिका, नवे निर्माण करा’ :-

यावेळी मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे यांनी विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक जिज्ञासेचे विशेष कौतुक केले. शिक्षण हे केवळ पाठ्यपुस्तकांपुरते मर्यादित न ठेवता प्रयोग, निरीक्षण आणि प्रत्यक्ष कृतीच्या माध्यमातून ज्ञान आत्मसात केले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात सातत्याने प्रयत्न करावेत, प्रश्न विचारण्याची आणि नव्या गोष्टी जाणून घेण्याची सवय जोपासावी. शैक्षणिक उपक्रमांसोबतच सामाजिक, सांस्कृतिक व सर्जनशील उपक्रमांमध्येही सक्रिय सहभाग घेऊन आपले कौशल्य विकसित करावे, असा प्रेरणादायी संदेश त्यांनी दिला.
पोलीस निरीक्षकांच्या भेटीने विद्यार्थ्यांमध्ये उत्साह :-
पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे यांनी विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांची आस्थेने पाहणी केल्याने विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. त्यांच्या कौतुकाच्या शब्दांनी विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला असून, भविष्यात आणखी कल्पक व उपयुक्त प्रकल्प साकारण्याची प्रेरणा मिळाल्याचे वातावरण प्रदर्शनस्थळी पाहायला मिळाले.
या विज्ञान प्रदर्शनातून विद्यार्थ्यांमध्ये ‘करून शिकणे’, वैज्ञानिक दृष्टिकोन, समस्या सोडविण्याची क्षमता आणि आत्मविश्वास विकसित होत असल्याचे दिसून आले. ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांमध्येही प्रचंड गुणवत्ता आणि कल्पकता असून, त्यांना योग्य व्यासपीठ, मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मिळाल्यास ते विज्ञान-तंत्रज्ञानासह विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करू शकतात, याची प्रभावी झलक या प्रदर्शनातून पाहायला मिळाली.
