Saturday, September 5, 2026
HomeGadchiroliपहाटेच्या भूकंपाने दक्षिण गडचिरोली हादरले; सिरोंचात ३.६ तीव्रतेचा धक्का...

पहाटेच्या भूकंपाने दक्षिण गडचिरोली हादरले; सिरोंचात ३.६ तीव्रतेचा धक्का…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

अहेरी-नागेपल्ली परिसरातही जाणवली सौम्य कंपने; प्राथमिक माहितीनुसार जीवित-वित्तहानी नाही,

गडचिरोली, दि. ३ सप्टेंबर : जिल्ह्याच्या दक्षिण भागात गुरुवारी पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याने काही काळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. सिरोंचा तालुक्यात पहाटे ४ वाजून ३६ मिनिटांच्या सुमारास ३.६ तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली. या भूकंपाची खोली सुमारे १० किलोमीटर असून, त्याचे केंद्र सिरोंचा तालुक्यातील राखीव वनक्षेत्र परिसरात असल्याची प्राथमिक माहिती आहे.

या भूकंपाचे सौम्य धक्के अहेरी तालुक्यातील अहेरी तसेच नागेपल्ली परिसरातही जाणवल्याची माहिती तहसील प्रशासनाकडून देण्यात आली आहे. पहाटेच्या वेळी अचानक जमिनीला कंपने जाणवल्याने नागरिकांमध्ये काही काळ घबराट निर्माण झाली. मात्र, प्राथमिक माहितीनुसार या भूकंपामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही.

भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर स्थानिक प्रशासनाने परिस्थितीची माहिती घेण्यास सुरुवात केली असून, संभाव्य नुकसानीबाबत पाहणी करण्यात येत आहे. सध्या कोणत्याही प्रकारच्या नुकसानीची नोंद झालेली नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन :-

भूकंपाच्या सौम्य धक्क्यांमुळे नागरिकांनी घाबरून न जाता शांतता राखावी आणि आवश्यक ती दक्षता बाळगावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे. तसेच भूकंपासंदर्भात सोशल मीडियावर अथवा अन्य माध्यमांतून प्रसारित होणाऱ्या अफवा व अप्रमाणित संदेशांवर विश्वास ठेवू नये, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

दक्षिण गडचिरोलीत भूकंपाची पुनरावृत्ती :-

सिरोंचा आणि अहेरी तालुक्यांत यापूर्वीही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. फेब्रुवारी २०२६ मध्ये दक्षिण गडचिरोलीत सौम्य भूकंपाची नोंद झाली होती. त्यावेळी सिरोंचा, अहेरी, आलापल्ली आणि नागेपल्ली परिसरातील नागरिकांना जमिनीची कंपने जाणवली होती.

दरम्यान, आजच्या भूकंपानंतर प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असून, नागरिकांनी कोणत्याही प्रकारची घबराट न करता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular