VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
जारावंडी परिसरातील घटनेने ग्रामस्थ संतप्त; वनविभागाच्या निष्काळजीपणाचा आरोप,
१८ ऑगस्टला चक्काजाम आंदोलनाचा इशारा,
गडचिरोली /एटापल्ली,१६ ऑगस्ट २०२६::- गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात वाघाच्या हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जारावंडी परिसरात वाघाने केलेल्या हल्ल्यात एका ५७ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, वनविभागाच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
जारावंडी परिसरात वाघाचा वावर सातत्याने जाणवत असतानाही त्याचा बंदोबस्त करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात येत नसल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. वाघाच्या हल्ल्यात नागरिकाचा जीव गेल्याने परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे.
या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी वनविभागाच्या निष्काळजीपणाचा निषेध करत आक्रमक भूमिका घेतली आहे. वाघाचा तातडीने बंदोबस्त करावा, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात तसेच वन्यप्राण्यांच्या वाढत्या हल्ल्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
दरम्यान, प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष न दिल्यास १८ ऑगस्ट रोजी चक्काजाम आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. त्यामुळे प्रशासन आणि वनविभाग या आंदोलनाची दखल घेऊन वाघाच्या बंदोबस्तासाठी कोणती पावले उचलतात, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
