VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
श्रावणातील अंतिम सोमवारी भक्तिमय वातावरण; माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांची विशेष उपस्थिती,
गडचिरोली/चामोर्शी, दि. ७ सप्टेंबर २०२६ :‘विदर्भाची काशी’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या चामोर्शी तालुक्यातील प्राचीन व ऐतिहासिक मार्कंडेश्वर देवस्थान येथे श्रावण मासातील अंतिम सोमवारी वैनगंगेच्या पवित्र तीरावर भव्य महागंगा पूजा व महाआरती सोहळा भक्तिमय वातावरणात उत्साहात पार पडला. मंत्रोच्चार, शंखनाद, डमरूचा निनाद आणि ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून आणि माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांच्या विशेष पुढाकारातून या धार्मिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांनी परिवारासह मार्कंडेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन विधिवत पूजा-अर्चा व आरती करून दर्शन घेतले. त्यानंतर सायंकाळी साडेपाच वाजता उत्तरवाहिनी वैनगंगा नदीच्या पवित्र तीरावर पुरोहितांच्या मंत्रोच्चारात गंगापूजनास सुरुवात झाली.

‘ॐ नमः शिवाय’ तसेच महामृत्युंजय मंत्राच्या पठणाने वातावरण आध्यात्मिक झाले. शंखनाद व डमरूच्या निनादात दीपप्रज्वलन करून महागंगा पूजा आणि महाआरती करण्यात आली. शेकडो दिव्यांच्या प्रकाशाने वैनगंगेचा पवित्र तीर उजळून निघाला. यावेळी उपस्थित भाविकांनी ‘हर हर महादेव’चा जयघोष करत भक्तिभावाने आरतीचा लाभ घेतला.
‘हा ऐतिहासिक आणि दिव्य सोहळा’ – डॉ. अशोकजी नेते :-

यावेळी मनोगत व्यक्त करताना डॉ. अशोकजी नेते म्हणाले की, मार्कंडेश्वर ऋषींचे विधिवत दर्शन व पूजा-अर्चा करण्याचे भाग्य लाभले, याचा मनापासून आनंद आहे. वैनगंगेच्या पावन तीरावर भव्य गंगा महापूजा पार पडणे ही अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून हा ऐतिहासिक व दिव्य सोहळा साकार होत असून, त्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार मानले.

या महागंगा पूजा व महाआरती सोहळ्यास विदर्भ संघटन मंत्री डॉ. उपेंद्रजी कोठेकर, गडचिरोलीचे आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे, भाजपा जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, आदिवासी मोर्चा प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवरावजी होळी, किसान मोर्चा प्रदेश सचिव रमेशजी भुरसे, ज्येष्ठ नेते डॉ. भारत खटी, भाजपा तालुका अध्यक्षा रोशनी वरघंटे, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष भास्कर बुरे, बंगाली आघाडी जिल्हाध्यक्ष सुरेश शहा, मार्कंडेश्वर समितीचे अध्यक्ष गजानन भांडेकर यांच्यासह संजय बारापात्रे, दिलीप चलाख, साईनाथ बुरांडे, रेवनाथ कुसराम, नरेश अल्सावार, केशव निंबोड, शेषराव कोहळे, विशाल माडवे तसेच मुरलीधर महाराज, अन्य महाराज, साधू-संत, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मार्कंडा देवस्थानच्या आध्यात्मिक वैभवात नवा अध्याय :-

श्रावण मासाच्या अंतिम सोमवारी वैनगंगेच्या पवित्र तीरावर झालेल्या या महागंगा पूजा व महाआरतीमुळे मार्कंडा देवस्थानच्या धार्मिक आणि सांस्कृतिक वैभवात आणखी एक मानाचा अध्याय जोडला गेला. या सोहळ्यामुळे भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, वैनगंगा नदीच्या पावन तीराला नव्या आध्यात्मिक परंपरेची जोड मिळाली आहे.
