Friday, September 11, 2026
HomeChamorshiगांजाच्या नशेत तरुणाचा निर्घृण खून; दोन अल्पवयीन संशयित ताब्यात...

गांजाच्या नशेत तरुणाचा निर्घृण खून; दोन अल्पवयीन संशयित ताब्यात…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

चामोर्शी तालुक्यातील वाघोली शिवारातील खळबळजनक घटना; दगड व लोखंडी हत्याराने वार करून केला खून, मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचाही प्रयत्न,

गडचिरोली/चामोर्शी, 09 सप्टेंबर 2026::- चामोर्शी तालुक्यातील वाघोली शिवारात ७ सप्टेंबर रोजी रात्री घडलेल्या ३४ वर्षीय तरुणाच्या निर्घृण खून प्रकरणाचा छडा लावण्यात चामोर्शी पोलिसांना यश आले आहे. गांजा मिळविण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून दोन अल्पवयीन मुलांनी नंदकिशोर मोतीलाल मिश्रा ऊर्फ बंटी याचा खून केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले असून, दोन्ही विधिसंघर्षित बालकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

७ सप्टेंबर रोजी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास चामोर्शी-मुल मार्गापासून सुमारे १०० मीटर अंतरावर वाघोली शिवारातील शेताजवळ एका पुरुषाचा मृतदेह आढळून आला होता. डोक्यात गंभीर दुखापत झाल्याचे दिसून आल्याने चामोर्शी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. मृताची ओळख पटत नसल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते. 

फॉरेन्सिक पथक, डॉग स्क्वॉड आणि फिंगरप्रिंट ब्युरोच्या मदतीने घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले तसेच मृताचा फोटो सोशल मीडियाच्या विविध ग्रुपवर प्रसारित करून ओळख पटविण्याचे प्रयत्न करण्यात आले. अखेर ८ सप्टेंबर रोजी मृताची ओळख नंदकिशोर मोतीलाल मिश्रा ऊर्फ बंटी (वय ३४, रा. तेली मोहल्ला, वॉर्ड क्र. ५, श्रीराम मंदिराजवळ, मुल, जि. चंद्रपूर) अशी पटली.

गांजासाठी मृताच्या घरी गेले आणि पुढे घडला थरार :-

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोन्ही विधिसंघर्षित बालकांकडे चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. त्यांना गांजा ओढायचा असल्याने नंदकिशोर मिश्रा ऊर्फ बंटी याच्याकडे गांजा मिळतो, अशी माहिती असल्याने ते ७ सप्टेंबर रोजी दुपारी त्याच्या घरी गेले होते. मात्र गांजा उपलब्ध नसल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर दोघे पुन्हा त्याच्याकडे गेले आणि काही वेळाने तिघेही बाहेर पडले. 

तपासानुसार, त्यानंतर त्यांनी दारू व गांजा सेवन केला. नशेत असताना वाघोली शिवारात वाद वाढला आणि एका अल्पवयीनाने नंदकिशोरच्या डोक्यात दगड मारला. त्यानंतर दोघांनी मिळून लोखंडी हत्याराने त्याच्यावर हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या नंदकिशोरचा मृत्यू झाला. 

मृतदेह मोटारसायकलवरून नेऊन विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न:-

खून केल्यानंतर प्रकरण उघडकीस येऊ नये म्हणून दोन्ही अल्पवयीनांनी मृतदेह मोटारसायकलवरून हलवून त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केल्याचेही तपासात समोर आले आहे. खुनासाठी वापरलेले हत्यार फेकून दिल्याची माहितीही त्यांनी पोलिसांना दिली आहे. 

पोलिसांच्या तपासाला वेग; दोन्ही विधिसंघर्षित बालक ताब्यात:-

पोलिस अधीक्षक एम. रमेश, अपर पोलिस अधीक्षक गोकुळराज जी., सहायक पोलिस अधीक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी अनिकेत हिरडे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली चामोर्शी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. पोलिस निरीक्षक महादेव ढाकणे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने संशयितांची चौकशी करून गुन्ह्याचा उलगडा केला. 

या खळबळजनक हत्याकांडाचा तपास पोलिस निरीक्षक महादेव ढाकणे, बिट अधिकारी सुमेध बनसोडे, पोलीस उपनिरीक्षक गणेश जंगले, शाहू दंडे तसेच पोलिस कर्मचाऱ्यांनी केला. दोन्ही विधिसंघर्षित बालकांना ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. 

गांजाच्या नशेतून सुरू झालेला वाद थेट खुनापर्यंत पोहोचल्याने चामोर्शी तालुक्यात या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular