Friday, September 11, 2026
HomeGadchiroliमहागड्या उपचारांसाठी गरजू रुग्णांना खा. डॉ. किरसान यांचा आधार; PMNRF मधून ५०...

महागड्या उपचारांसाठी गरजू रुग्णांना खा. डॉ. किरसान यांचा आधार; PMNRF मधून ५० लाखांहून अधिक मदत…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली, 09 सप्टेंबर 2026::- गडचिरोली–चिमूर लोकसभा क्षेत्रातील गंभीर आजारांनी ग्रस्त आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी खासदार डॉ. नामदेव किरसान यांचा पुढाकार दिलासादायक ठरत आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे प्रधानमंत्री राष्ट्रीय सहायता निधी (PMNRF) अंतर्गत आतापर्यंत जवळपास २३ गरजू रुग्णांना ५० लाखांहून अधिक रुपयांची आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यात आली आहे.

खासदार म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर १ जून २०२४ पासून आजपर्यंत या मदतीसाठी सातत्याने प्रयत्न करण्यात आले आहेत. कर्करोग, किडनी ट्रान्सप्लांट तसेच अन्य गंभीर आजारांवरील उपचारांसाठी मोठ्या प्रमाणात खर्च येत असल्याने गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांसमोर आर्थिक संकट निर्माण होते. अशा परिस्थितीत शासकीय सहायता निधीतून मिळणारी मदत रुग्णांसह त्यांच्या कुटुंबीयांसाठी मोठा आधार ठरत आहे.

गडचिरोली–चिमूर लोकसभा क्षेत्राचा मोठा भौगोलिक विस्तार आणि दुर्गम भाग लक्षात घेता अनेक नागरिकांना गंभीर आजारांवरील महागडे उपचार परवडत नाहीत. त्यामुळे केवळ आर्थिक अडचणीमुळे कोणत्याही रुग्णाचा उपचार थांबू नये, यासाठी खासदार डॉ. किरसान यांच्या माध्यमातून शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

रुग्णांच्या कुटुंबीयांकडून आर्थिक मदतीची मागणी प्राप्त झाल्यानंतर वैद्यकीय अहवाल, आवश्यक कागदपत्रे आणि उपचाराचा अंदाजित खर्च यासह संबंधित प्रकरणांची पूर्तता करून ती प्रधानमंत्री राष्ट्रीय सहायता निधीसाठी पाठविण्यात येतात. या प्रक्रियेत आवश्यक मार्गदर्शन तसेच सातत्यपूर्ण पाठपुरावा करण्यात आल्याने अनेक रुग्णांना उपचारासाठी आर्थिक मदत मिळवून देणे शक्य झाले आहे.

आरोग्याच्या प्रश्नांनाही प्राधान्य :-

खासदार डॉ. नामदेव किरसान हे केवळ विकासकामांपुरते मर्यादित न राहता लोकसभा क्षेत्रातील नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्नांनाही प्राधान्य देत आहेत. गंभीर आजारांवरील उपचाराचा वाढता खर्च लक्षात घेता गरजू कुटुंबांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी त्यांचा पाठपुरावा सुरू आहे.

“गडचिरोली–चिमूर लोकसभा क्षेत्रातील कोणताही गरजू रुग्ण केवळ आर्थिक परिस्थितीमुळे उपचारापासून वंचित राहू नये, हा आपला प्रयत्न आहे,” असे खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी सांगितले.

प्रधानमंत्री राष्ट्रीय सहायता निधीसह केंद्र व राज्य शासनाच्या विविध आरोग्यविषयक योजनांचा लाभ अधिकाधिक गरजू नागरिकांना मिळवून देण्यासाठी यापुढेही सातत्याने प्रयत्न सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular