Thursday, September 17, 2026
HomeEtapalliएटापल्लीतील बंद शासकीय पेट्रोल पंपावर CPI आक्रमक; तातडीने सुरू करण्याची मागणी...

एटापल्लीतील बंद शासकीय पेट्रोल पंपावर CPI आक्रमक; तातडीने सुरू करण्याची मागणी…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

‘विकास सर्व्हिस स्टेशन’ सुरू करण्यासाठी निश्चित तारीख जाहीर करा; गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन,

गडचिरोली /एटापल्ली, 17 सप्टेंबर, 2026::-पंचायत समिती परिसरातील मागील अनेक महिन्यांपासून बंद असलेले ‘विकास सर्व्हिस स्टेशन’ शासकीय पेट्रोल पंप तातडीने सुरू करण्यात यावे, तसेच पेट्रोल पंप कोणत्या निश्चित तारखेला सुरू होणार आहे, याची लेखी माहिती प्रशासनाने द्यावी, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (CPI) वतीने करण्यात आली आहे. याबाबत CPIच्या पदाधिकाऱ्यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करून प्रशासनाचे लक्ष वेधले.

एटापल्ली पंचायत समिती परिसरातील हा शासकीय पेट्रोल पंप नागरिक, शासकीय कर्मचारी, शेतकरी, वाहनधारक तसेच विविध शासकीय कामांसाठी येणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाची सुविधा आहे. मात्र, गेल्या अनेक महिन्यांपासून पेट्रोल पंप बंद असल्याने वाहनधारकांना पेट्रोल व डिझेलसाठी इतर ठिकाणी जावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांचा वेळ तसेच अतिरिक्त प्रवासाचा आर्थिक खर्च वाढत असून, या समस्येमुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

शासकीय यंत्रणेच्या परिसरात असलेली ही सुविधा बंद असल्याने त्याचा थेट परिणाम पंचायत समिती परिसरात ये-जा करणाऱ्या नागरिकांवर होत आहे. त्यामुळे पेट्रोल पंप बंद ठेवण्यामागील नेमके कारण काय आहे, तो सुरू करण्यासाठी प्रशासनाकडून आतापर्यंत कोणती कार्यवाही करण्यात आली आहे आणि तो कोणत्या निश्चित तारखेपर्यंत सुरू केला जाणार आहे, याची स्पष्ट माहिती लेखी स्वरूपात देण्याची मागणी CPIने केली आहे.

नागरिकांच्या दैनंदिन गरजा आणि सोयीशी संबंधित असलेली शासकीय सुविधा दीर्घकाळ बंद ठेवणे योग्य नसल्याचे CPIच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनातून नमूद केले. संबंधित विभागाने तातडीने आवश्यक दुरुस्ती व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून पेट्रोल पंप सुरू करावा, अशी मागणीही करण्यात आली.

यावेळी कॉ. सचिन मोतकुरवार, जिल्हा सहसचिव, CPI; कॉ. सुरज जककुलवार, जिल्हा सदस्य, तसेच तालुक्यातील नागरिक उपस्थित होते.

कॉ. सचिन मोतकुरवार म्हणाले, “जनतेच्या सोयीसाठी असलेली आणि नागरिकांच्या विश्वासाचे स्थान असलेली शासकीय सुविधा अनेक महिने बंद राहणे योग्य नाही. प्रशासनाने तातडीने आवश्यक दुरुस्ती व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून पेट्रोल पंप सुरू करावा आणि तो सुरू होण्याची निश्चित तारीख लेखी कळवावी. मागणीची दखल न घेतल्यास जनतेच्या प्रश्नासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल.”

दरम्यान, प्रशासन या मागणीवर कोणती कार्यवाही करते आणि बंद असलेला शासकीय पेट्रोल पंप प्रत्यक्षात कधी सुरू होतो, याकडे एटापल्लीतील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular