VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
सत्कार सोहळ्यासह नवीन कार्यकारिणीची निवड; माजी जिल्हाध्यक्षा माया सिरसाठ यांचे सर्व परिचारिकांना उपस्थितीचे आवाहन,
गडचिरोली, १७ सप्टेंबर २०२६ ::-महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद नर्सेस संघटनेची गडचिरोली जिल्हास्तरीय आमसभा रविवार, दिनांक २० सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजता पंचायत समिती सभागृह, धानोरा रोड, गडचिरोली येथे आयोजित करण्यात आली आहे. या आमसभेत परिचारिकांच्या विविध प्रलंबित मागण्या, सेवाविषयक समस्या आणि त्यावरील उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात येणार असून, सत्कार समारंभासह नवीन जिल्हा कार्यकारिणी गठित करण्यात येणार आहे. या आमसभेला जिल्ह्यातील सर्व परिचारिका भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संघटनेच्या माजी जिल्हाध्यक्षा श्रीमती माया सिरसाठ यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद नर्सेस संघटना ही राज्यातील जिल्हा परिषद परिचारिकांच्या हक्कांसाठी तसेच त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी शासन आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा करणारी संघटना आहे. परिचारिकांच्या सेवाविषयक अडचणी आणि विविध समस्या शासनदरबारी मांडण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून वेळोवेळी निवेदने देण्यात आली असून, आंदोलनेही करण्यात आली आहेत.
प्रलंबित मागण्यांवर होणार सविस्तर चर्चा :-
गडचिरोली जिल्हा हा अतिदुर्गम, डोंगराळ आणि नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो. अशा प्रतिकूल परिस्थितीत जिल्ह्यातील परिचारिका भगिनी अहोरात्र प्रामाणिकपणे आरोग्यसेवा बजावत आहेत. त्यांच्या सेवाविषयक अडचणी, सुरक्षितता, कामाचा वाढता व्याप आणि विविध प्रलंबित प्रश्नांवर या आमसभेत विचारमंथन करण्यात येणार आहे.
परिचारिकांच्या समस्या राज्यस्तरावर मांडून त्या मार्गी लावण्यासाठी आवश्यक उपाययोजना, संघटनेच्या पुढील वाटचालीची दिशा आणि नव्या पदाधिकाऱ्यांची भूमिका याबाबतही चर्चा होणार आहे. तसेच नवीन कार्यकारिणीची निवड प्रक्रिया पार पाडण्यात येणार असून, सत्कारासाठी निवड करण्यात आलेल्या परिचारिकांचा गौरव करण्यात येणार आहे.
संघटनेच्या एकजुटीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन :-
गडचिरोली जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद नर्सेस संघटनेशी एकनिष्ठ असलेल्या सर्व पदाधिकारी, सदस्य आणि परिचारिका भगिनींनी या आमसभेला आवर्जून उपस्थित राहावे. तसेच सत्कारमूर्ती म्हणून निवड झालेल्या परिचारिकांनी आणि संबंधित पदाधिकाऱ्यांनीही कार्यक्रमाला न चुकता उपस्थित राहावे, असे आवाहन माजी जिल्हाध्यक्षा श्रीमती माया सिरसाठ यांनी केले आहे.
परिचारिकांच्या हक्कांचे संरक्षण, सेवाविषयक प्रश्नांची सोडवणूक आणि संघटनेच्या भविष्यातील कार्यासाठी सर्व भगिनींची एकजूट महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले. शासनाने नेमून दिलेली कर्तव्ये आणि परिचारिकांवरील कामाचा व्याप लक्षात घेता त्यांच्या अडचणींवर ठोस उपाययोजना होणे आवश्यक आहे. त्यामुळे कोणत्याही भूलथापांना बळी न पडता सर्वांनी लोकशाही पद्धतीने आपल्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आमसभेत सहभागी व्हावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
परिचारिकांच्या विविध प्रश्नांना संघटितपणे वाचा फोडून पुढील दिशा निश्चित करण्यासाठी ही आमसभा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील सर्व नर्सेस भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संघटनेच्या कार्यात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन श्रीमती माया सिरसाठ यांनी पुन्हा एकदा केले आहे.
