Sunday, September 20, 2026
HomeGadchiroliगडचिरोली पोलिसांचा दुहेरी उपक्रम; विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीचा संदेश, नागरिकांच्या तक्रारींचे निवारण...

गडचिरोली पोलिसांचा दुहेरी उपक्रम; विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीचा संदेश, नागरिकांच्या तक्रारींचे निवारण…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

 कारमेल हायस्कूलमध्ये ५०० विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत मार्गदर्शन,

 तक्रार निवारण दिनाला १४० हून अधिक नागरिकांची उपस्थिती,

गडचिरोली, 20 सप्टेंबर 2026::-माओवादासह विविध आव्हानांचा सामना करताना गडचिरोली पोलीस दलाकडून सामाजिक जनजागृती आणि नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या उपस्थितीत १९ सप्टेंबर रोजी गडचिरोली पोलीस स्टेशन येथे तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले. त्याचबरोबर शहरातील कारमेल हायस्कूलमध्ये ‘ड्रग फ्री कॅम्पस’ संकल्पनेअंतर्गत अंमली पदार्थ विरोधी जनजागृती कार्यशाळा घेण्यात आली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना व्यसनमुक्त जीवनाचा संदेश देण्यासोबतच नागरिकांच्या तक्रारी व समस्या जाणून घेऊन त्यावर कायदेशीर कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

५०० विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांची जाणीव :-

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या ‘नशा मुक्त भारत २०४७’ अभियानांतर्गत गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली कारमेल हायस्कूलच्या सभागृहात अंमली पदार्थ विरोधी मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेला शाळेतील ५०० विद्यार्थी, शिक्षक आणि मुख्याध्यापक उपस्थित होते.

यावेळी विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांच्या सेवनामुळे होणारे वैयक्तिक, सामाजिक आणि कौटुंबिक दुष्परिणाम समजावून सांगण्यात आले. व्यसनाच्या प्रलोभनाला बळी न पडता शिक्षण, आरोग्य आणि उज्ज्वल भविष्याला प्राधान्य देण्याचे आवाहन करण्यात आले.

अंमली पदार्थांचे सेवन ही समाजाला उद्ध्वस्त करणारी गंभीर समस्या असून, निरोगी शरीर आणि व्यसनमुक्त जीवनासाठी विद्यार्थ्यांनी शिक्षणावर लक्ष केंद्रित करावे, असे मार्गदर्शन पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी केले. आपल्या भवितव्याचा विचार करून योग्य निर्णय घ्यावा आणि व्यसनांपासून दूर राहावे, असेही त्यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांच्या आजूबाजूच्या परिसरात कोणी अंमली पदार्थांचा पुरवठा करत असल्याचे निदर्शनास आल्यास त्याची माहिती शिक्षक किंवा पोलीस विभागाने उपलब्ध करून दिलेल्या हेल्पलाइन क्रमांकांवर तातडीने देण्याचे आवाहन करण्यात आले.

कार्यशाळेत कारमेल हायस्कूलचे मुख्याध्यापक फादर मेल्जो चेरीयन यांनीही मार्गदर्शन केले. याशिवाय विद्यार्थ्यांना सायबर फसवणूक, सोशल मीडियाचा सुरक्षित वापर तसेच ‘गुड टच-बॅड टच’ या महत्त्वपूर्ण विषयांवर माहिती देण्यात आली.

तक्रार निवारण दिनाला १४० हून अधिक नागरिकांची उपस्थिती :-

पोलीस स्टेशन गडचिरोली येथे पोलीस अधीक्षक एम. रमेश आणि सहायक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे यांच्या उपस्थितीत तक्रार निवारण दिनाची बैठक पार पडली. यावेळी १४० हून अधिक नागरिकांनी उपस्थित राहून आपल्या विविध तक्रारी व समस्या मांडल्या.

नागरिकांच्या तक्रारींची पोलीस अधीक्षकांनी दखल घेत संबंधित अधिकारी व अंमलदारांना आवश्यक त्या सूचना दिल्या. प्रलंबित प्रकरणांची चौकशी करून नियमानुसार गुन्हा दाखल करणे किंवा कायदेशीर निपटारा करण्यासाठी पुढील सात दिवसांची मुदत देण्यात आली.

बैठकीदरम्यान वरिष्ठ अर्ज आणि स्थानिक अर्जांशी संबंधित विविध प्रकरणांचा आढावा घेण्यात आला. काही प्रकरणांचा बैठकीतच निपटारा करण्यात आला, तर उर्वरित प्रकरणांमध्ये तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच नव्याने प्राप्त झालेल्या तक्रारींचीही नोंद घेण्यात आली.

या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिक आणि पोलीस प्रशासन यांच्यातील संवाद अधिक दृढ करण्यासोबतच नागरिकांच्या समस्या प्रभावीपणे सोडविण्यावर भर देण्यात आला. कोणतीही अडचण किंवा समस्या असल्यास नागरिकांनी थेट पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास आणून द्यावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी केले.

 सराफा व्यापारी संघटनेकडून पोलीस अधीक्षकांचा सत्कार :-

मागील काळात सराफा दुकान लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना तातडीने अटक करून कारवाई केल्याबद्दल व्यापारी असोसिएशनच्या वतीने पोलीस अधीक्षक एम. रमेश यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी व्यापारी प्रतिनिधींनी पोलीस प्रशासनाच्या कारवाईबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

‘ऑल हॅन्ड्स मिट’मधून पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या समस्यांवर चर्चा :-

नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासोबतच पोलीस दलातील अधिकारी व अंमलदारांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी ‘ऑल हॅन्ड्स मिट’ उपक्रमांतर्गत स्वतंत्र बैठक घेण्यात आली.

पोलीस अधीक्षक एम. रमेश आणि सहायक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत पोलीस स्टेशनमधील अधिकारी व अंमलदारांच्या दैनंदिन कामकाजातील समस्या, अडचणी तसेच वैयक्तिक समस्यांवर चर्चा करण्यात आली. त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह मान्यवरांची उपस्थिती :-

या विविध उपक्रमांना पोलीस अधीक्षक एम. रमेश, सहायक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण फेगडे, गडचिरोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण आणि कारमेल हायस्कूलचे मुख्याध्यापक फादर मेल्जो चेरीयन यांची उपस्थिती होती.

विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्तीची जाणीव निर्माण करणे, नागरिकांच्या तक्रारींवर कायदेशीर कार्यवाही करणे आणि पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या अडचणी जाणून घेणे, अशा विविध उद्देशांनी गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने हे उपक्रम राबविण्यात आले.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular