VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
घारगाव, रामाळा, फराडा, मोहर्लीतील महिलांची एकजूट; प्रश्न सुटेपर्यंत दर मंगळवारी आंदोलनाचा निर्धार
गडचिरोली /चामोर्शी, 29 सप्टेंबर 2026::- आज जमीन अधिग्रहणाच्या प्रस्तावाविरोधात शेतकरी महिलांचा आवाज आता अधिक बुलंद होत असून, घारगाव, रामाळा, फराडा आणि मोहर्ली या गावांमध्ये शेतकरी महिला व ग्रामस्थांनी एकत्र येत शांततामय रॅली काढून आपला विरोध नोंदविला. जमिनी, शेती आणि उपजीविकेच्या हक्कांच्या संरक्षणासाठी महिलांनी एकजुटीचे शक्तिप्रदर्शन केले.
जमीन अधिग्रहणामुळे शेतकऱ्यांच्या शेतीवर, उपजीविकेवर तसेच भविष्यातील आर्थिक स्थैर्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर चारही गावांतील शेतकरी महिला व नागरिक मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झाले. घोषणांनी परिसर दणाणून सोडत जमीन व हक्कांच्या संरक्षणासाठी एकजूट कायम ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
घारगाव, रामाळा आणि फराडा येथून स्वतंत्रपणे निघालेल्या रॅलीचा समारोप मोहर्ली येथे करण्यात आला. यावेळी महिलांनी आपला विरोध शांततामय आणि लोकशाही मार्गाने पुढे नेण्याची भूमिका स्पष्ट केली. जमीन अधिग्रहणाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला.
दर मंगळवारी आंदोलनाचा निर्धार :-
यापुढे दर मंगळवारी शांततामय शेतकरी आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती शेतकरी महिलांनी दिली. या आंदोलनात परिसरातील अधिकाधिक शेतकरी व नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहनही करण्यात आले.
दरम्यान, १४ गावांतील शेतकरी आणि महिलांची वाढती एकजूट पाहता जमीन अधिग्रहणाचा प्रश्न पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत प्रशासन कोणती भूमिका घेते आणि पुढील काळात यावर काय तोडगा निघतो, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
