VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
नारायणपूर येथील ६० वर्षीय गोपीकाबाई गायकवाड हत्या प्रकरणाची उकल,
स्थानिक गुन्हे शाखा व घोट पोलिसांची संयुक्त कारवाई,
गडचिरोली /चामोर्शी,(घोट) 30 सप्टेंबर 2026::- नारायणपूर चक नं. २ येथे शेतात गेलेल्या ६० वर्षीय महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याच्या अत्यंत क्लिष्ट खून प्रकरणाचा गडचिरोली पोलिसांनी छडा लावला आहे. तपासातील बारकावे, तांत्रिक पुरावे आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संदीप रावजी टेकाम (वय ३५) याला अटक केली. पूर्ववैमनस्य व जुन्या वादातून महिलेवर काठीने मारहाण करून त्यानंतर दगडाने ठेचून खून केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
दि. ५ सप्टेंबर २०२६ रोजी नारायणपूर चक नं. २ येथील गोपीकाबाई रामचंद्र गायकवाड या शेतात गेल्या होत्या. मात्र, संध्याकाळपर्यंत त्या घरी परतल्या नाहीत. त्यामुळे नातेवाईक व ग्रामस्थांनी शेत परिसरात शोध घेतला असता त्यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला. याप्रकरणी चामोर्शी पोलीस ठाण्यात अप. क्र. ४६०/२०२६, कलम १०३(१) भारतीय न्याय संहिता २०२३ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
जखमांवरून तपासाला मिळाली नवी दिशा :-
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत तपासाला गती दिली. पोलीस अधीक्षक एम. रमेश व अपर पोलीस अधीक्षक गोकुल राज जी. यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि पोमकें घोट येथील अधिकारी-अंमलदारांची स्वतंत्र तपास पथके तयार करण्यात आली.
सुरुवातीला पोलिसांच्या हाती ठोस पुरावे नसताना, मृतदेहावरील जखमांचे बारकाईने निरीक्षण करताना सहायक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे यांनी जखमांच्या स्वरूपावरून आरोपी डावखुरा असण्याची शक्यता व्यक्त केली. या महत्त्वपूर्ण निरीक्षणामुळे तपासाला नवी दिशा मिळाली.
त्यानंतर पोलिसांनी मयत महिलेचे कौटुंबिक संबंध, जुन्या वादांची पार्श्वभूमी, तांत्रिक पुरावे तसेच गोपनीय माहितीच्या आधारे संशयितांचा शोध सुरू केला. तपासाची चक्रे वेगाने फिरवत पोलिसांनी संदीप टेकाम याला ताब्यात घेतले.
चौकशीत खुनाची कबुली; न्यायालयाकडून ४ दिवसांची पोलीस कोठडी :-
पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीत पूर्ववैमनस्य व जुन्या वादातून गोपीकाबाई गायकवाड यांच्यावर काठीने मारहाण करून त्यानंतर दगडाने ठेचून खून केल्याचे निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी नमूद केले. त्यानंतर दि. २९ सप्टेंबर रोजी संदीप रावजी टेकाम याला अटक करण्यात आली.
आरोपीला चामोर्शी येथील प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे करीत आहेत.
तपास पथकाचे वरिष्ठांकडून कौतुक :-
ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या आदेशाने, अपर पोलीस अधीक्षक गोकुल राज जी. यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. अरुण फेगडे, सपोनि. भगतसिंग दुलत, सपोनि. आगलावे, पोमकें घोटचे सपोनि. कल्पेश खारोडे, पोलीस ठाणे रेगडीचे सपोनि. गवळी, स्थागुशाचे पोउपनि. विश्वा कराळे तसेच अधिकारी व अंमलदारांनी या तपासात सहभाग घेतला.
ठोस पुरावे उपलब्ध नसतानाही तांत्रिक विश्लेषण, घटनास्थळावरील निरीक्षण आणि गोपनीय माहितीच्या आधारे क्लिष्ट खून प्रकरणाची उकल केल्याबद्दल पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी तपास पथकाचे कौतुक केले आहे.
