VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
मंजेगावात 4 ऑक्टोबरला शेतकऱ्यांशी आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांचा थेट संवाद,
महसूल व भूमी अभिलेख विभागाचे अधिकारीही राहणार उपस्थित,
गडचिरोली /चामोर्शी, (घोट ), 30 सप्टेंबर 2026::-रेगडी हळदवाही जिल्हा परिषद क्षेत्रातील सात गावांमधील शेतकरी मागील अनेक दशकांपासून शेतीच्या पट्ट्यांपासून वंचित आहेत. 1958 पासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नावर शासनाने तातडीने तोडगा काढून संबंधित शेतकऱ्यांना शेतीचे पट्टे द्यावेत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेण्यासाठी रविवार, 4 ऑक्टोबर 2026 रोजी दुपारी 12 वाजता मौजा मंजेगाव, ता. चामोर्शी येथे शेतकरी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. मिलिंद भाऊ नरोटे प्रमुख उपस्थित राहून शेतकऱ्यांशी थेट संवाद साधणार आहेत. तसेच राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रणय भाऊ खुणे यांच्यासह संबंधित महसूल व भूमी अभिलेख विभागाचे प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार असून, शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा केली जाणार आहे.
रेगडी हळदवाही क्षेत्रातील मंजेगाव, किसाननगर, मछली, चक चापलवाडा, हळदवाही, हळदवाहीटोला, पेटतळा आणि भाडभीडी परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपली समस्या मांडावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
‘चलो मंजेगाव!’ या आवाहनासह शेतकऱ्यांच्या हक्काच्या शेतीपट्ट्यांचा प्रश्न शासनाच्या दरबारात प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे. त्यामुळे या संवाद कार्यक्रमाकडे परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
स्थळ : मौजा मंजेगाव, ता. चामोर्शी
दिनांक : रविवार, 4 ऑक्टोबर 2026
वेळ : दुपारी 12 वाजता
प्रमुख उपस्थिती : आमदार डॉ. मिलिंद भाऊ नरोटे, प्रणय भाऊ खुणे व संबंधित प्रशासकीय अधिकारी.
