VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
आ. बंटी भांगडिया व माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट,
जिल्ह्यातील प्रलंबित विकासकामांवर शासनस्तरावर पाठपुरावा,
महाराष्ट्र /मुंबई, 01 ऑक्टोबर 2026::-जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला अधिक गती मिळावी, तसेच जिल्ह्यातील विविध विकासकामे आणि स्थानिक प्रश्न शासनदरबारी प्रभावीपणे मांडले जावेत, यासाठी आमदार बंटीभाऊ भांगडिया आणि माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथील वर्षा निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत गडचिरोली जिल्ह्याशी संबंधित विविध विकासविषयक बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
गडचिरोली जिल्हा भौगोलिकदृष्ट्या विस्तीर्ण असून, दुर्गम व ग्रामीण भागातील नागरिकांना आजही अनेक मूलभूत सुविधांसाठी विविध अडचणींचा सामना करावा लागतो. जिल्ह्यातील रस्ते, पायाभूत सुविधा, नागरिकांच्या मूलभूत गरजा, प्रलंबित विकासकामे तसेच भविष्यातील विकासाच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या विविध बाबी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या.
या भेटीदरम्यान जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी शासनस्तरावर आवश्यक असलेला पाठपुरावा, प्रलंबित कामांना चालना आणि स्थानिक प्रश्नांच्या निराकरणासाठी विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. गडचिरोलीच्या विकासाचा वेग वाढविण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून आवश्यक सहकार्य मिळावे, यासाठीही यावेळी भूमिका मांडण्यात आली.
गडचिरोलीसारख्या मोठ्या व विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण जिल्ह्यातील विविध प्रश्न थेट मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्याने या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. जिल्ह्यातील विकासकामांना शासनाची साथ मिळवून देण्यासाठी मुंबईच्या सत्ताकेंद्रात करण्यात आलेल्या या पाठपुराव्यामुळे आगामी काळात विविध विकासकामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या भेटीप्रसंगी नगरसेवक सागर निंबोरकर आणि पंकज खोबे उपस्थित होते. जिल्ह्याच्या विकासाशी संबंधित प्रश्न थेट शासनाच्या सर्वोच्च पातळीवर मांडण्यासाठी झालेल्या या भेटीची राजकीय व प्रशासकीय वर्तुळातही चर्चा होत आहे.
