VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
जनगणनेत ओबीसी समाजासाठी स्वतंत्र कॉलमचा समावेश करण्याची विलास चिंचघरे यांची मागणी,
गडचिरोली /चामोर्शी, 01 ऑक्टोबर 2026::-ओबीसी समाजाची सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक स्थिती स्पष्टपणे समोर यावी तसेच लोकसंख्येच्या प्रमाणानुसार आरक्षण व शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी ओबीसी समाजाची स्वतंत्र जातिनिहाय जनगणना करण्यात यावी, अशी मागणी चामोर्शी काँग्रेस कमिटीचे युवा शहर अध्यक्ष विलास चिंचघरे यांनी केली आहे.
आगामी जनगणनेमध्ये ओबीसी समाजाची लोकसंख्या स्वतंत्रपणे नोंदविण्यासाठी जनगणना प्रपत्रात ओबीसी समाजासाठी स्वतंत्र कॉलमचा समावेश करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
देशातील विविध समाजघटकांची लोकसंख्या, सामाजिक परिस्थिती आणि त्यांच्या गरजा यांची अचूक माहिती शासनाच्या धोरणनिर्मितीसाठी महत्त्वाची ठरते. मात्र, ओबीसी समाजाची जातिनिहाय लोकसंख्या स्पष्टपणे उपलब्ध नसल्यामुळे आरक्षण, शैक्षणिक संधी, रोजगार तसेच विविध कल्याणकारी योजनांचे नियोजन करताना अडचणी निर्माण होत असल्याचे चिंचघरे यांनी म्हटले.
ओबीसी समाजाची वास्तविक लोकसंख्या समोर आल्यास सामाजिक न्यायाच्या धोरणांना अधिक ठोस आधार मिळू शकतो. त्यामुळे आगामी जनगणनेत ओबीसी समाजाची स्वतंत्र जातिनिहाय नोंद करून त्यासाठी स्वतंत्र कॉलम ठेवावा, अशी मागणी त्यांनी शासनाकडे केली आहे.
ओबीसी समाजाच्या लोकसंख्येची अधिकृत आणि अचूक आकडेवारी उपलब्ध झाल्यास त्यानुसार आरक्षण, शैक्षणिक सुविधा, रोजगाराच्या संधी आणि शासनाच्या विविध योजनांचे प्रभावी नियोजन करता येईल. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारने या मागणीचा गांभीर्याने विचार करून ओबीसींची स्वतंत्र जातिनिहाय जनगणना करण्यासाठी ठोस निर्णय घ्यावा, असेही विलास चिंचघरे यांनी नमूद केले.
