VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी
आमदार डॉ. देवरावजी होळी यांची गडचिरोली पं.स. च्या वार्षिक आमसभेत अधिकाऱ्यांना सूचना.
विविध विषयांना धरून गडचिरोली पंचायत समितीची वार्षिक आमसभा गाजली.
सर्वसामान्यांच्या तक्रारीवर अधिकारी व कर्मचाऱ्यांना कानपिचक्या.
गडचिरोली/चामोर्शी,२४ फेब्रुवारी२०२४::-केंद्र व राज्य सरकारच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक विभागाने एकमेकांच्या सहकार्याने व समन्वयाने काम करावे अशी सूचना आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी गडचिरोली पंचायत समितीच्या वार्षिक आमसभेत उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना केली.
गडचिरोली पंचायत समितीच्या वतीने आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या अध्यक्षतेखाली वार्षिक आमसभेचे आयोजन जिल्हा परिषद माध्यमिक शाळेच्या सभागृहात करण्यात आले.
आमसभेला संवर्ग विकास अधिकारी सुरेंद्रजी गोंगले, माजी पंचायत समिती सभापती मारोतरावजी इचोडकर, माजी उपसभापती विलासजी दशमुखे ,माजी पंचायत समिती सदस्य रामरतन गोहणे ,कृ उ बा स संचालक हेमंत बोरकुटे नायब तहसीलदार ठाकरे, यांच्यासह मान्यवर मंचावर उपस्थित होते.
ही आमसभा स्थानिकांच्या तक्रारी व विविध विषयांना धरून गाजली. सर्वसामान्यांच्या तक्रारीवर आमदार डॉ देवराव जी होळी यांनी सभेतच अधिकारी व कर्मचाऱ्यांना कानपिचक्या दिल्या.
