VAINGANGA NEWS 24 /विशेष प्रतिनिधी,
नारायणपूर–गडचिरोली सीमेवर मोठी चकमक, AK-47 व SLR जप्त,
गडचिरोली/भामरागड,६ फेब्रुवारी २०२६::- भामरागड उपविभागात माओवाद्यांविरोधात मोठी कारवाई सुरू आहे. दिनांक ३ फेब्रुवारीच्या संध्याकाळी मिळालेल्या विश्वसनीय माहितीच्या आधारे, उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड यांच्या नेतृत्वात C-60 च्या १४ पथकांसह मौजा फोदेवाडा परिसरात, नारायणपूर-गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवर शोधमोहीम राबविण्यात आली.
काल दिवसा झालेल्या चकमकीत माओवाद्यांचे दोन तळ उद्ध्वस्त करण्यात आले असून मोठ्या प्रमाणात माओवादी साहित्य जप्त झाले. मात्र, घनदाट जंगल व प्रतिकूल भूभागामुळे माओवादी पसार झाले होते.
आज सकाळी कारवाईला आणखी धार देत अतिरिक्त ०४ C-60 पथक आणि CRPF QAT चे ०१ पथक अभियानात दाखल झाले. सकाळपासून अधूनमधून झालेल्या चकमकीत एका पुरुष माओवाद्याचा मृतदेह आढळून आला असून त्याच्यासोबत १ AK-47 आणि १ SLR रायफल जप्त करण्यात आली आहे. मृत माओवाद्याची ओळख अद्याप स्पष्ट झालेली नाही.
दरम्यान, आज संध्याकाळी उशिरा झालेल्या जोरदार गोळीबारात C-60 चा एक जवान जखमी झाला असून त्याला पुढील उपचारासाठी बाहेर हलविण्यात आले आहे.
परिसरात शोधमोहीम सुरूच असून, अभियान संपल्यानंतर गडचिरोली पोलीस दलाकडून अधिकृत माहिती देण्यात येणार आहे.
