Friday, May 22, 2026
HomeBhamragadकोट्यवधींच्या कामाची निविदा प्रक्रिया नियमबाह्य...?

कोट्यवधींच्या कामाची निविदा प्रक्रिया नियमबाह्य…?

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

भामरागडमधील प्रकार, आमदार धर्मरावबाबा आत्राम आक्रमक भूमिका,

गडचिरोली / भामरागड,११ एफ्रिल २०२६::- भामरागड पंचायत समितीमध्ये चक्क शासकीय सुट्टीच्या दिवशी संगनमताने निविदा प्रक्रिया उरकून मर्जीतील कंत्राटदाराला तब्बल ६ कोटींची कामे देण्यात आली आहेत. संबंधित दोषी अधिकारी आणि कंत्राटदारावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना तत्काळ निलंबित करण्याची मागणी आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांच्याकडे केली आहे.

आदिम जमातीचे संरक्षण व विकास कार्यक्रमांतर्गत (२०२३-२४) भामरागड तालुक्यातील आरेवाडा ग्रामपंचायत हद्दीतील कियर येथे बंदिस्त नाली बांधकामाचे कंत्राट माजी जिल्हा परिषद अध्यक्ष परशुराम कुत्तरमारे यांचे चिरंजीव शुभम कुत्तरमारे यांना देण्यात आले. या कामाचा कार्यारंभ आदेश ४ मार्च २०२६ रोजी निर्गमित करण्यात आला. मात्र, ही संपूर्ण प्रक्रिया राबवताना नियमांना केराची टोपली दाखवण्यात आली. 

१ मार्च २०२६ रोजी शासकीय सुट्टी असतानाही गटविकास अधिकारी व्हिडिओ संबंधित अभियंता आणि कंत्राटदार यांनी संगमतांनी कार्यालयात बसून निविदा प्रक्रिया पूर्ण केली हे नियमांचे उल्लंघन आहे अधिकृत कार्यालयीन कामकाज बंद असताना निविदा काढणे हा संबंधित अधिकारी यांनी कंत्राटदार यांच्यातील भ्रष्ट युतीचा पुरावा असल्याचा दावा आत्राम यांनी केला.

आमदार धर्मरावबाबा आत्राम :-

 शासकीय नियमांची पायमल्ली करणाऱ्यांना पाठीशी घातले जाणार नाही. पदाचा गैरवापर करून शासनाची फसवणूक करणाऱ्या संबंधित बीडीओ आणि अभियंत्याला तत्काळ निलंबित करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत.

प्रशासनाच्या कारवाईकडे लक्ष :-

या तक्रारीमुळे भामरागड पंचायत समितीमधील भ्रष्टाचाराची लक्तरे वेशीवर टांगली गेली असून, आता जिल्हा परिषद प्रशासन यावर काय पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आमदारांची तक्रार प्राप्त झाली असून सखोल चौकशी केली जाईल. दोषी आढळल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही, असे मुख्य कार्यकारी अधिकारी गाटे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे भामरागड प्रशासनातील अधिकारी आणि कंत्राटदारांचे धाबे दणाणले आहेत.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular