Wednesday, July 29, 2026
HomeChamorshiएमआयडीसीसाठी जमीन अधिग्रहणावरून मुधोली चक क्र. २ मध्ये तणाव...

एमआयडीसीसाठी जमीन अधिग्रहणावरून मुधोली चक क्र. २ मध्ये तणाव…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

ड्रोन सर्वेक्षण पथकाला ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयात रोखले

गडचिरोली /चामोर्शी,१० जुलै २०२६::- गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील मुधोली चक क्र. २ येथे एमआयडीसीसाठी प्रस्तावित जमीन अधिग्रहणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे. अधिग्रहण प्रक्रियेला तीन महिन्यांची स्थगिती देण्यात आल्याचे सांगितले जात असतानाही ड्रोनद्वारे जमिनीची मोजणी करण्यासाठी आलेल्या पथकाला संतप्त शेतकऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयात रोखून धरल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसीसाठी प्रस्तावित जमीन अधिग्रहणाला मुधोली चक क्र. २ येथील शेतकऱ्यांनी सुरुवातीपासूनच तीव्र विरोध दर्शविला आहे. शेतकऱ्यांच्या आक्षेपानंतर प्रशासनाकडून अधिग्रहण प्रक्रियेला तीन महिन्यांची स्थगिती देण्यात आल्याची माहिती देण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही ड्रोनच्या माध्यमातून जमिनीचे सर्वेक्षण व मोजणी करण्यासाठी पथक दाखल झाल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली.

संतप्त शेतकरी आणि ग्रामस्थांनी संबंधित पथकाला ग्रामपंचायत कार्यालयात रोखून धरत प्रशासनाकडे जाब विचारला. स्थगिती लागू असताना सर्वेक्षण करण्याचे आदेश कोणत्या स्तरावरून देण्यात आले, याचे स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. तसेच शेतकऱ्यांना विश्वासात न घेता कोणतीही मोजणी किंवा सर्वेक्षण करण्याचा प्रयत्न झाल्यास तीव्र विरोध केला जाईल, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला.

घटनेची माहिती मिळताच तहसीलदारांसह पोलीस प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. अधिकाऱ्यांनी शेतकरी प्रतिनिधींशी चर्चा करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम राहिल्याने तातडीने कोणताही तोडगा निघू शकला नाही. यावेळी ग्रामपंचायत परिसरात महिला व पुरुष शेतकऱ्यांची मोठी गर्दी झाली होती.

शेतकऱ्यांनी स्पष्ट भूमिका घेत अधिग्रहणाबाबत प्रशासनाचा अधिकृत निर्णय जाहीर होईपर्यंत कोणत्याही प्रकारची मोजणी, ड्रोन सर्वेक्षण किंवा पुढील प्रक्रिया होऊ देणार नसल्याचे सांगितले.

दरम्यान, जमीन अधिग्रहणाचा विषय आधीपासूनच संवेदनशील बनला असून प्रशासन आणि शेतकरी यांच्यातील संवादाचा अभाव पुन्हा एकदा समोर आला आहे. आता या प्रकरणात प्रशासन कोणती भूमिका घेते आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांवर काय निर्णय होतो, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.

शेतकऱ्यांचा सवाल :-

“अधिग्रहण प्रक्रियेला स्थगिती असताना ड्रोनद्वारे जमिनीची मोजणी करण्याचा प्रयत्न नेमका कोणाच्या आदेशाने करण्यात आला?” असा थेट सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला असून, प्रशासनाने याबाबत पारदर्शक भूमिका घेऊन शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular