Tuesday, July 28, 2026
HomeDhanoraराजोली रेती घाटावरील युवक हत्याकांडाचा तातडीने छडा लावा...

राजोली रेती घाटावरील युवक हत्याकांडाचा तातडीने छडा लावा…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

दोषींना अटक करा – माजी आमदार डॉ. देवराव होळी,

गडचिरोली/धानोरा,१६ जुलै २०२६::- धानोरा तालुक्यातील राजोली रेती घाटावर घडलेल्या युवकाच्या निर्घृण हत्याकांडाने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून, या प्रकरणाचा तातडीने, निष्पक्ष आणि पारदर्शक तपास करून दोषींना कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी ठाम मागणी भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी केली आहे.

डॉ. होळी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या हत्याकांडाशी संबंधित रेती घाट मालक, त्याचे भागीदार, सुरक्षा रक्षक, कर्मचारी, वाहनचालक तसेच घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या सर्व व्यक्तींची सखोल चौकशी करण्यात यावी. घटनेच्या वेळी नेमके काय घडले, कोण-कोण उपस्थित होते, त्यांनी पोलिसांना वेळेत माहिती दिली का आणि पुरावे सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक पावले उचलली का, याचीही कसून चौकशी होणे गरजेचे आहे.

तसेच, रेती घाटावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे सर्व फुटेज तात्काळ जप्त करून त्याची फॉरेन्सिक तपासणी करण्यात यावी. त्या आधारे आरोपी आणि त्यांना मदत करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा शोध घेऊन तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली.

डॉ. होळी यांनी पुढे म्हटले की, या प्रकरणाच्या तपासाबाबत जनतेमध्ये अनेक शंका निर्माण झाल्या असून, रेती घाटाशी संबंधित व्यक्ती किंवा इतर कोणाचीही मिलीभगत होती का, तसेच तपासात कोणत्याही स्तरावर निष्काळजीपणा अथवा अनुचित हस्तक्षेप झाला का, याचाही निष्पक्ष तपास होणे आवश्यक आहे. कोणालाही क्लीन चिट देण्यापूर्वी सर्व बाबींची सखोल चौकशी करणे ही तपास यंत्रणेची जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मृत युवकाच्या कुटुंबीयांना तातडीने न्याय मिळावा, दोषींना कठोर शिक्षा व्हावी आणि कोणत्याही दबावाशिवाय सत्य जनतेसमोर यावे, अशी मागणी करत मागण्या मान्य न झाल्यास भाजपा आदिवासी मोर्चाच्या वतीने तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी प्रशासनाला दिला.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular