VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
गडचिरोली /धानोरा,१९ ऑगस्ट २०२६::- आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शासनाकडून विविध योजना, सुविधा आणि घोषणा केल्या जात असतानाच २१ आदिवासी मुली शिक्षणापासून वंचित असल्याची बाब समोर आल्याने शिक्षण व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मंत्री आले, बैठका झाल्या, आश्वासनांची सरबत्ती झाली; मात्र प्रत्यक्षात या मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही.
आदिवासी समाजातील मुला-मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाकडून कोट्यवधी रुपयांच्या योजना राबविल्या जातात. दुर्गम आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे धोरणही शासनाने आखले आहे. मात्र, प्रत्यक्ष परिस्थितीत विद्यार्थिनींना शिक्षणाची संधीच मिळत नसेल, तर या योजनांचा लाभ नेमका कोणाला मिळतो, असा सवाल पालक व नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
या २१ विद्यार्थिनींच्या शैक्षणिक भवितव्याचा प्रश्न केवळ एका शाळेचा किंवा एका विभागाचा विषय नसून, आदिवासी मुलींच्या शिक्षणाच्या हक्काशी निगडित गंभीर प्रश्न आहे. शिक्षणात खंड पडल्यास या मुलींच्या पुढील आयुष्यावर त्याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, संबंधित प्रश्नावर बैठका आणि चर्चा झाल्यानंतरही ठोस तोडगा निघत नसल्याने पालकांमध्ये नाराजी आहे. प्रशासनाने कागदोपत्री कार्यवाही न करता प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करून विद्यार्थिनींचे शिक्षण तातडीने सुरू होईल, यासाठी ठोस पावले उचलण्याची मागणी होत आहे.
घोषणा, आश्वासने आणि बैठकांपेक्षा आता कृतीची गरज आहे. या २१ आदिवासी मुलींना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रशासन कधी ठोस निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
